
ज्येष्ठ मराठी अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झालं आहे. विलास उजवणे यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी मालिका, नाटक, चित्रपट क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली होती. वादळवाट मालिकेतील भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले होते.
विलास उजवणे यांच्यावर मागील काही दिवसांपासून मीरारोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. उजवणे यांच्या पार्थिवावर आज शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
(नक्की वाचा- Actor Manoj Kumar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे 87 व्या वर्षी निधन, बॉलिवूडवर शोककळा)
डॉ. विलास उजवणे यांनी वादळवाट, चार दिवस सासूचे, दामिनी अशा लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनय केला. याशिवाय कुलस्वामिनी, 26 नोव्हेबर या सिनेमांमध्येही ते झळकले होते.
राज्याची मंत्री आशिष शेलार यांना सोशल मीडियावर पोस्ट करत डॉ. उजवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आशिष शेलार यांनी लिहिलं की, "भावपूर्ण श्रद्धांजली! मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने मराठी कला विश्वावर शोककळा पसरली आहे. 'चार दिवस सासूचे', 'दामिनी', 'वादळवाट' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. या कठीण प्रसंगी उजवणे कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.ओम शांती!"
(नक्की वाचा- महिलेच्या जाळ्यात फसला! 150 रुपयांचा मोह, सागर कारंडेकडून 60 लाख लुटले, कसा झाला स्कॅम?)
खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं की, "अभिनय क्षेत्रात सुरुवातीच्या खडतर काळात मला अतिशय आपुलकीने मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे.समोर आलेल्या आजारांचा त्यांनी अतिशय कणखरपणे सामना केला, या लढ्यात त्यांच्या पत्नी अंजली वहिनी यांनीही त्यांना खंबीर साथ दिली. ही झुंज अखेर थांबल्याने कला विश्वातील एक अत्यंत दिलदार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना मिळो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world