सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रिया बापट सध्या तिच्या एका खळबळजनक खुलाशामुळे चर्चेत आली आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला आलेल्या एका अत्यंत वाईट आणि कटू अनुभवाबद्दल तिने नुकतेच एका मुलाखतीत उघडपणे भाष्य केले आहे. शूटिंगदरम्यान एका सह-अभिनेत्याने प्रोफेशनल मर्यादा ओलांडून तिला कशा प्रकारे अस्वस्थ केले आणि त्या परिस्थितीत नेमकी कशी प्रतिक्रिया द्यावी, हे तिला तेव्हा समजले नाही, असे तिने सांगितले.
'किसिंग सीनला विरोध नव्हता, पण...'
प्रिया बापटने 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिला सिनेमात किसिंग सीन देण्याबाबत कधीही आक्षेप नव्हता, पण तो सीन कथेची गरज असणे आवश्यक होते. प्रिया म्हणाली, "माझ्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी हा एक होता. स्क्रिप्ट रीडिंगच्या वेळेपासूनच या किसिंग सीनबाबत माझ्या मनात शंका होती. मी दिग्दर्शकाला सतत विचारत होते की, या सीनची इथे काय गरज आहे? मला तो सीन करायचा नव्हता असा भाग नव्हता, तर चित्रपटाच्या कथेत तो कसा योग्य वाटेल, हा माझा प्रश्न होता. कारण तो तिथे फिट बसत नव्हता."
मनात अनेक शंका असूनही प्रियाने अखेर दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून स्वतःला त्या सीनसाठी तयार केले. "जर ती स्क्रिप्टची मागणी असेल, तर मी तयार आहे," असे म्हणत तिने होकार दिला.
अभिनेत्याने ओलांडल्या मर्यादा
प्रियाने पुढे सांगितले की, प्रत्यक्ष शूटिंग सुरू झाल्यावर परिस्थिती हाताबाहेर गेली. गाण्याच्या शूटिंगदरम्यान संबंधित अभिनेत्याने गाणे 'इम्प्रोव्हाइज' करण्याच्या बहाण्याने वारंवार मर्यादा ओलांडल्या. प्रिया म्हणाली, "असे अनेकदा घडले की, तो अभिनेता गाण्यात बदल सुचवून मला वारंवार किस करत राहिला. मला माहीत नाही की मी त्यावेळी ठामपणे विरोध का करू शकले नाही. कदाचित मी इंडस्ट्रीत नवीन होते आणि अशा परिस्थितीचा सामना कसा करावा, हेच मला समजले नाही."
शूटिंगनंतरही केला पाठलाग
हा त्रास केवळ कॅमेऱ्यासमोरच मर्यादित नव्हता, तर शूटिंग संपल्यानंतरही त्या अभिनेत्याने प्रियाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याबद्दल सांगताना प्रिया म्हणाली, "माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आम्ही एकाच हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रूम्समध्ये राहत होतो. तो मला वारंवार मेसेज करायचा आणि स्वतःकडे बोलवायचा. 'चल, मी तुला स्विमिंग शिकवतो', 'आपण ब्रेकफास्ट एकत्र करूया का?' असे मेसेज तो पाठवायचा. मी त्याला स्पष्ट सांगितले की, मला यात अजिबात रस नाही", असं प्रियाने सांगितलं.
प्रिया बापटचा सिनेप्रवास
प्रिया बापट ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नामांकित चेहरा आहे. तिने तिच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'मुन्ना भाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्ना भाई', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'काकस्पर्श', 'टाइमपास 2', 'वजनदार' या सिनेमांमध्ये प्रियाने काम केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world