Crime News: मुंबईतील उच्चभ्रू परिसर असलेल्या जुहू येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांच्या आईच्या घरातून सुमारे 25 लाख रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. टंडन कुटुंबाचा विश्वास संपादन करून हा डल्ला मारणाऱ्या रशी छाब्रिया (वय 47) या महिलेला जुहू पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी महिलेने घरातच राहून पाळत ठेवत ही चोरी केली .
2020 पासून टंडन कुटुंबाच्या संपर्कात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली आरोपी महिला रशी छाब्रिया ही गेल्या 6 वर्षांपासून टंडन कुटुंबाच्या परिचयाची होती. रवीना टंडन यांच्या वृद्ध आईची देखभाल आणि वैद्यकीय सुश्रुषा करण्यासाठी ती नियमितपणे त्यांच्या घरात ये-जा करत असे. या प्रदीर्घ काळात तिने संपूर्ण टंडन कुटुंबाचा प्रचंड विश्वास संपादन केला होता.
(नक्की वाचा- Mumbai Monsoon: मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार! पुढच्या आठवड्यात मुंबईत मान्सूनचे आगमन)
तिजोरी फोडून दागिने आणि महागडी घड्याळे लंपास
विश्वासू असल्याचा फायदा घेत रशीने घरातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. आरोपी महिलेवर घरातील मुख्य तिजोरी फोडल्याचा आरोप आहे. तिने तिजोरीतून सोन्याचे आणि हिऱ्याचे मौल्यवान दागिने तसेच दोन अत्यंत महागडी ब्रँडेड घड्याळे चोरली.
चोरी उघडकीस कशी आली?
काही दिवसांपूर्वी रवीना यांच्या आईला दागिन्यांची गरज भासली असता, तिजोरीतून दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात इतर कोणाचाही प्रवेश नसल्याने कुटुंबीयांनी सुरुवातीला रशीकडेच याबाबत विचारणा केली. मात्र, तिने अत्यंत हुशारीने सर्व आरोप फेटाळून लावले आणि आपल्याला काहीच माहित नसल्याचा आव आणला.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)
पोलिस तक्रारीनंतर आरोपी जेरबंद
कुटुंबीयांचा संशय बळावल्यानंतर त्यांनी थेट जुहू पोलिस ठाण्यात धाव घेऊन रशी छाब्रियाविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रशीला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून चोरीला गेलेली महागडी घड्याळे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या घड्याळांव्यतिरिक्त उर्वरित सोन्या-हिऱ्याचे दागिने तिने कुठे लपवून ठेवले आहेत किंवा कोणाकडे गहाण ठेवले आहेत, याचा शोध जुहू पोलिस घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world