जाहिरात
This Article is From Mar 06, 2024

चाळीत जन्म, बॉलिवूडसाठी इंजिनियरींग सोडलं; आता एका चित्रपटासाठी घेतोय 20 कोटी

आता चार बेडरूमच्या भव्य फ्लॅटमध्ये राहणारा विकी एकेकाळी मुंबईतील 10x10 च्या खोलीत राहत होता.

चाळीत जन्म, बॉलिवूडसाठी इंजिनियरींग सोडलं; आता एका चित्रपटासाठी घेतोय 20 कोटी
मुंबई:

बॉलिवूडमध्ये करिअर घडवणं सोपं नसतं. यासाठी कठोर परिश्रम आणि सातत्य आवश्यक असतं. जॅकी श्रॉफ, मनोज वाजपेयी, पंकज त्रिपाठी यांसारख्या अनेक कलाकारांनी आपला स्ट्रगलिंगचा काळ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. आता कोट्यधीश झालेल्या या कलाकारांना एकेकाळी स्वप्नाळू शहर असलेल्या मुंबईत राहण्यासाठी मोठे कष्ट करावे लागले. आज अशाच एका अभिनेत्याचा चाळीपासून ते सुपरस्टारपर्यंतचा प्रवास पाहणार आहोत.

या अभिनेत्याचं नाव आहे विकी कौशल. कठोर परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर विकी कौशलने आता चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये आपलं स्थान निर्माण केल आहे. एका चित्रपटात काम करण्यासाठी कोट्यवधी रुपये घेणारा विकी कौशल एकेकाळी मुंबईतील मालाड परिसरातील एका चाळीत राहत होता. 

विकी कौशलने एका मुलाखतीदरम्यान आपला भूतकाळ सांगितला. आता चार बेडरूमच्या भव्य फ्लॅटमध्ये राहणारा विकी एकेकाळी मुंबईतील 10x10 च्या खोलीत राहत होता. त्यावेळी चाळींमध्ये सार्वजनिक शौचालयं होती, सर्वजणं याचाच वापर करीत असल्याचंही त्यांने आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं. स्टंट डायरेक्टर म्हणून यश मिळवण्यापूर्वी माझ्या वडिलांना विविध आर्थिक संकटांशी सामना करावा लागला. परंतू, माझ्या आई-वडिलांनी कधीच आमच्यापासून याबाबत लपवलं नाही. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक संघर्ष करावा लागत असल्याचं आम्हाला लहान वयात लक्षात आलं होतं, असंही त्याने यावेळी सांगितलं. विकी कौशलने अभिनेता होण्यासाठी आपलं इंजिनियरींगचं शिक्षण सोडल्याचं अनेकांना माहिती नाही. चित्रपटसृष्टी विषयी त्याला आकर्षण होतं. त्यामुळे जेव्हा त्याला बॉलिवूडची संधी मिळाली तेव्हा त्याने राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतलेल्या विकी कौशलने आपली नोकरी अर्धवट सोडली आणि चित्रपटांकडे वळला.

विकी कौशलच्या करिअरची सुरुवात अभिनयापासून झाली नाही. त्याने अनुराग कश्यप याच्या क्राईम ड्रामा 'गँग्स ऑफ वासेपूर' (2012) साठी साहाय्य केले. त्या काळात विकी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करत होता. 'मसान' (2015) या चित्रपटात त्याला पहिल्यांदा मुख्य भूमिका मिळाली. 'मसान' आणि 'रमन राघव 2.0' सारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी विकी कौशलच कौतुक झालं. त्यानंतर 2018 मध्ये आलिया भट्टच्या 'राझी' आणि रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'संजू' चित्रपटात अभिनय केल्यानंतर त्याला व्यापक ओळख मिळाली आणि त्याचा एक मोठा चाहतावर्ग तयार झाला.

2019 मधील 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटातील मुख्य भूमिकेने विकी कौशलला बॉलिवूडमधील एक प्रमुख अभिनेता म्हणून उभं केलं आणि याच चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.


विकी कौशल आणि सुपरस्टार कतरिना कैफच्या लग्नाचीही मोठी चर्चा झाली. 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सवाई माधवपूर येथील फोर्ट बरवारा येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्ट येथे पारंपारिक हिंदू पद्धतीत दोघांनी लग्नगाठ बांधली. 2024 पर्यंत विकी कौशलची एकूण संपत्ती अंदाजे 41 कोटी आहे, तर कतरिना कैफची एकूण संपत्ती 200 कोटींपेक्षा जास्त आहे. काही वृत्त माध्यमांनुसार विकी कौशल आता एका चित्रपटासाठी 20 कोटी रुपये आकारतो.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com