बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांच्या चेक बाउंस प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत. थकीत कर्ज फेडण्यासाठी यादव यांनी 30 दिवसांची वाढीव मुदत मागितली होती. जी न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती स्वराना कांता शर्मा यांनी स्पष्ट शब्दात सुनावले की, "नो मीन्स नो. मी निकाल राखून ठेवतेय, आता अधिक वेळ दिला जाणार नाही. असं ते म्हणाले. कॉमेडी किंग राजपाल यादव सध्या खऱ्या आयुष्यात मोठ्या संकटात अडकला आहे. 6 कोटी रुपयांच्या चेक बाउंस प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. "मला अजून 30 दिवस द्या," अशी विनंती राजपालने केली होती, पण न्यायाधीशांनी ती झटकून लावत "आता वेळ संपली आहे," असे ठणकावून सांगितले.
हे प्रकरण 2024 मधील असून सत्र न्यायालयाने यादव यांना चेक बाउंसप्रकरणी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने पैसे भरण्याच्या अटीवर या शिक्षेला स्थगिती दिली होती. मात्र, वारंवार संधी देऊनही देय रक्कम जमा न झाल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तक्रारदार कंपनीने 6 कोटी रुपयांच्या अंतिम सेटलमेंटवर संमती दर्शवली होती, परंतु उर्वरित रक्कम भरण्यास राजपाल यादव असमर्थ ठरले आहेत. राजपाल यादव यांनी भावूक होत न्यायालयात सांगितले की, त्यांनी पैसे फेडण्यासाठी फ्लॅट्स विकले असून मोठे आर्थिक नुकसान सोसले आहे.
मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की वारंवार दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे प्रकरणाला विनाकारण विलंब होत आहे. सध्या न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला असून राजपाल यादव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुनावणीदरम्यान राजपाल यादव भावूक झाले होते. "मी माझे फ्लॅट्स विकले आहेत, खूप नुकसान सहन केलंय. गरज पडली तर पाच वेळा तुरुंगात जाईन," असं विधान त्यांनी केलं. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत विचारलं की, "जर तुम्ही पैसे द्यायला तयार आहात, तर मग हा खटला का चालतोय? थेट पेमेंट करा." यापूर्वी फेब्रुवारीमध्ये राजपाल यादव यांना तिहार जेलची हवा खावी लागली होती.
राजपाल यादव यांनी व्यवसायासाठी कर्ज घेतले होते, ज्याचे चेक बाउंस झाले. तक्रारदार कंपनीने समझोता करण्याची तयारी दाखवली होती, मात्र राजपाल यादव यांनी दिलेला शब्द पाळला नाही. आता हायकोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला असून लवकरच अंतिम निकाल येण्याची चिन्हे आहेत. राजपाल यादव यांनी आपली आर्थिक परिस्थिती मांडत भावनिक साद घातली असली, तरी कायद्याच्या चौकटीत न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. यापूर्वी त्यांना दीड कोटी रुपये भरल्यानंतर अंतरिम जामीन मिळाला होता. आता न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, ज्यामुळे राजपाल यादव यांच्या पुढील प्रवासाची दिशा ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world