सुरज कसबे, प्रतिनिधी:
Sonali Bendre Land Scam: मावळ तालुक्यातील उकसान येथील एका जमिनीच्या व्यवहारामुळे बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बेहल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संबंधित जमीन ही वडिलोपार्जित कुळ हक्काची असून ती बेकायदेशीरपणे विकत घेतल्याचा दावा स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणी आता वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.
अभिनेत्री सोनाली बेंद्रेवर गंभीर आरोप
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चंद्रकांत शिंदे यांनी केलेल्या दाव्यानुसार, उकसान येथील ३० गुंठे जमिनीवर १९५७ पूर्वीपासून त्यांच्या कुटुंबाचा कुळ हक्क आहे. मात्र, खोट्या कागदपत्रांच्या आधारे हा हक्क डावलून ही जमीन विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, संबंधित जागेवर बेकायदेशीर बांधकाम करण्याचा प्रयत्न आणि कुटुंबीयांना दमदाटी केल्याचेही शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
यापूर्वी हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते, मात्र दिवाणी स्वरूपाचे असल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या या जागेवर मनाई आदेश अर्थात स्टे ऑर्डर मिळवण्यासाठी मागणी करण्यात आली असून, प्रकरणाची पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, सोनाली बेंद्रे यांचे वकील राजू शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, फिर्यादी शेतकरी केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि पैसे उकळण्याच्या उद्देशाने अभिनेत्री सोनाली बेंद्रे व गोल्डी बेहल यांची बदनामी करत आहे, असा प्रतिदावा सोनाली यांच्या वकिलांनी केला आहे. या हायप्रोफाईल प्रकरणामुळे संपूर्ण मावळ परिसरात सध्या मोठी चर्चा रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world