
हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते श्याम बेनेगल यांचं आज 23 डिसेंबरला निधन झालं. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वी 14 डिसेंबरला त्यांनी 90 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर ही धक्कादायक बातमी समोर आली. श्याम बेनेगल यांच्या निधनाच्या वृत्तानंतर चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी सायंकाळी साधारण 7 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंकुर, निशांत, मंथन, जुबैदा, वेलकम टू सज्जनपूर आणि भूमिका सारख्या चित्रपटांसाठी चर्चेत असलेले बेनेगल यांचा समांतर चित्रपटांच्या अग्रणी दिग्दर्शकांमध्ये समावेश आहे. श्याम यांना 1976 मध्ये पद्मश्री, 1991 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
नक्की वाचा - Year Ender 2024 : ना शाहरुख, ना सलमान, ना अमिर, 'या' कलाकारांनी गाजवले 2024
श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांनी भारतीय सिनेमाला दिग्गज कलाकार दिले. यामध्ये नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, अमरीश पुरी, अनंत नाग, शबाना आजमी, स्मिता पाटील आणि सिनेमेटोग्राफर गोविंद निहलानी यांचा समावेश आहे. जवाहरलाल नेहरू आणि सत्यजीत रे यांच्यावर माहितीपटाची निर्मिती करण्याव्यतिरिक्त त्यांनी दूरदर्शनसाठी यात्रा, कथा सागर आणि भारत एक खोज या मालिकांचं दिग्दर्शन केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world