बॉलिवूडचे सुपरस्टार येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अॅडमिट करुन घेतले आहे. सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल उलटसुलट चर्चा आणि अफवा पसरू नयेत यासाठी सनी देओल यांच्या टीमकडून अधिकृत हेल्थ अपडेट जारी करण्यात आला आहे.
सनी देओलच्या टीमचे निवेदन
सनी देओल यांच्या टीमने प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते सध्या डॉक्टरांच्या निगरानीखाली आहेत. पुढील प्रतिक्रिया आणि अपडेट्स मिळाल्यावर तात्काळ शेअर केले जातील. कृपया त्यांच्या आरोग्याबद्दल खोट्या अफवा पसरवू नका. त्यांच्या लवकरात लवकर बरं होण्यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी आणि कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करावा, अशी विनंती आहे."
कलाकारांनी घेतली भेट
धर्मेंद्र रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त समजताच, संपूर्ण बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी रुग्णालयात धाव घेतली. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने सायंकाळी रुग्णालयात येऊन धर्मेंद्र यांची विचारपूस केली.
( नक्की वाचा : Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल )
सलमान खानच्या पाठोपाठ शाहरुख खानने देखील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. अभिनेता गोविंदानेही रुग्णालयात भेट दिली. त्यानंतर अभिनेत्री अमीषा पटेलनेही त्यांची भेट घेतली, त्यावेळी त्या भावूक दिसल्या. धर्मेंद्र यांचे नातू आणि सनी देओलचे पुत्र करण देओल आणि राजवीर देओल यांनीही रुग्णालयात भेट देऊन आजोबांची विचारपूस केली.
(नक्की वाचा- Dharmendra Net Worth: धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती किती? 100 एकर जागेत बनवलंय फार्म हाऊस, वाचा सर्व डिटेल्स)
हेमा मालिनी यांची पोस्ट
धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमध्ये जन्मलेले धरम सिंह देओल आजही हिंदी सिनेसृष्टीत सक्रिय आहेत आणि त्यांचे चाहते त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world