
बॉलिवूड सिनेमाला हॉलिवूड सिनेमाचा फील देणारा 'तुंबाड' सिनेमा 6 वर्षांनी चित्रपटगृहामध्ये पुन्हा प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांचा सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुंबाड सिनेमाला प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम पाहून निर्मात्यांनी आता 'तुंबाड 2' सिनेमाचा घोषणा केली आहे.
सिनेमाच्या निर्मात्यांनी 'तुंबाड'चा दुसरा भाग आणण्याची घोषणा केली आहे. 'तुंबाड 2' ची घोषणा करताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या टीझरची सुरुवात विनायक आणि त्याचा मुलगा पांडुरंग यांच्यापासून होते, यासोबत सोहम शाहचा आवाजही ऐकायला मिळत आहे. "वेळेचे चक्र गोल आहे, जे गेले ते पुन्हा परत येईल... दारही पुन्हा एकदा उघडेल", असा डायलॉग सोहम शाहाच्या आवाजात ऐकू येत आहे.
राहिल अनिल बर्वे यांनी तुंबाड सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. 2018 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. मात्र, समीक्षकांनी सिनेमाचं कौतुक केल होतं. त्यावेळी या सिनेमाने 10 कोटींची कमाई केली होती आणि दोन राष्ट्रीय पुरस्कारही जिंकले होते. पण आता सहा वर्षांनंतर पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतरही सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.