Trisha Krishnan Video: अभिनेते आणि राजकारणी विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत 234 पैकी 106 जागांवर आघाडी मिळवत मोठे यश संपादन केले आहे. या निकालांच्या धामधुमीतच प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन विजय यांच्या चेन्नईतील निवासस्थानी पोहोचल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सध्या तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी डीएमके, भाजपशी युती असलेला अण्णा द्रमुक (AIADMK) आणि अभिनेता विजय यांचा नवा पक्ष टीव्हीके यांच्यात चुरशीची त्रिकोणी लढत पाहायला मिळत आहे. या राजकीय घडामोडींदरम्यान 'ANI' वृत्तसंस्थेने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून त्यामध्ये त्रिशा कारमधून विजय यांच्या घरी पोहोचताना दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी पक्षाने निवडणुकीत मुसंडी मारली, त्याच दिवशी त्रिशाचा 43वा वाढदिवस देखील आहे. तिने आपल्या वाढदिवसाची सुरुवात तिरुपती येथील तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरात दर्शन घेऊन केली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
(नक्की वाचा : Viral Video: विजय यांना जिंकवून मी तमिळनाडूत धोनीपेक्षाही लोकप्रिय होईन, प्रशांत किशोर यांचा VIDEO होतोय VIRAL)
तमिळ सिनेसृष्टीतील अतिशय यशस्वी आणि लोकप्रिय जोडी
विजय आणि त्रिशा ही तमिळ सिनेसृष्टीतील एक अत्यंत यशस्वी आणि लोकप्रिय जोडी मानली जाते. त्यांनी 'गिल्ली', 'थिरुपाची', 'आधी', 'कुरुवी' आणि नुकत्याच गाजलेल्या 'लिओ' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर या दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा आणि तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण या दोघांनीही त्यावर कधीही अधिकृत भाष्य केलेले नाही. विजय यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून आणि त्यांच्या वैयक्तिक घटस्फोटाच्या अर्जातील काही बाबी समोर आल्यापासून त्यांच्या खासगी आयुष्याकडे लोकांचे आणि माध्यमांचे विशेष लक्ष लागले आहे. काही राजकीय विरोधकांनीही टीका करताना त्यांच्या मैत्रीचा उल्लेख केला आहे.
Actor #Trisha Krishnan was spotted arriving at the residence of TVK chief Vijay in Chennai.
— Movie Tamil (@_MovieTamil) May 4, 2026
Meanwhile, #TVK is currently leading in 112 out of the total 234 seats across the state.#ThalapathyVijay
pic.twitter.com/3LjMWF3S1g
त्रिशा कृष्णन थलापती विजय यांच्या घरी पोहोचली?
नुकत्याच झालेल्या एका विवाह सोहळ्याला देखील हे दोघे एकाच कारमधून एकत्र आल्याचे वृत्त समोर आले होते, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागल्या होत्या. त्रिशाने 23 एप्रिल रोजी मतदान केल्यानंतरचा आपला फोटो देखील चाहत्यांसोबत शेअर केला होता. सध्या ती तिचा आगामी तमिळ सिनेमा 'करुप्पू'च्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे, ज्यामध्ये ती अभिनेता सूर्यासोबत दिसणार आहे. अशा परिस्थितीत विजय यांच्या पक्षाला मिळत असलेल्या राजकीय यशाच्या पार्श्वभूमीवर त्रिशाने त्यांच्या घरी जाऊन घेतलेली ही भेट केवळ वाढदिवसाचे सेलिब्रेशन आहे की राजकीय यशाचे अभिनंदन, याबाबत सर्वत्र चर्चा रंगली आहे. पण दोघांनीही त्यांच्या प्रदीर्घ मैत्रीबद्दल किंवा सोशल मीडियावरील अफवांबद्दल मौन पाळणेच पसंत केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world