Yek Number Marathi Movie: 'येक नंबर' सिनेमाच्या वर्ल्ड डिजिटल प्रीमिअरची घोषणा ZEE5 कडून करण्यात आलीय. प्रेम आणि राजकीय महत्त्वाकांक्षेचे कथानक असलेल्या या सिनेमाध्ये धैर्य घोलप आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. झी स्टुडिओज, नाडियादवाला ग्रँडसन्स एंटरटेनमेंट आणि सह्याद्री फिल्म्स या बॅनरअंतर्गत तेजस्विनी पंडित आणि वरदा नाडियादवाला हे सिनेमाचे निर्माते आहेत. या सिनेमामध्ये रोमान्स, नाट्य, राजकीय उत्कंठावर्धक घडामोडी आणि थरार यांची सांगड पाहायला मिळणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी या सिनेमाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर करण्यात असल्याची घोषणा करण्यात आलीय. राजेश मापुस्कर यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
काय आहे सिनेमाची कहाणी?
सिनेमाची कथा सधनपूरच्या प्रतापभोवती फिरणारी आहे. प्रताप (Pratap) हा गावातील एक उमदा आणि राजकारणामध्ये करिअर घडवण्याचा प्रयत्न करणारा तरुण आहे. तसेच पिंकी या आपल्या बालमैत्रिणीचे मन जिंकण्याचा तो प्रयत्न करत असतो. पिंकीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विचारांचा मोठा पगडा आहे. "तुझे माझ्यावर प्रेम असेल तर तू राज साहेबांना गावात आण", अशी गळ पिंकी प्रतापला घालते. तिचे हे आव्हान प्रताप स्वीकारतो. यापुढे सिनेमामध्ये जे काही घडते ते अतिशय थरारक आहे. सिनेमामध्ये ग्रामीण भागातील रांगडेपणा आणि शहरातील आव्हाने यांची सांगड घालण्यात आलीय. प्रेम, महत्त्वाकांक्षा, राजकीय विचारधारा या भावनांचा शोध घेण्यात आलाय आणि त्यामुळेच हा सिनेमा मनोरंजन करण्यासोबतच विचार करायलाही भाग पाडतो.
(नक्की वाचा: Jantar Mantar Choomantar: दिवाळीच्या मुहूर्तावर 'जंतर मंतर छूमंतर' हॉरर कॉमेडी सिनेमाची घोषणा)
ZEE5चे चीफ बिझनेस ऑफिसर मनिष कालरा (Manish Kalra) म्हणाले, "आमच्या मराठी पोर्टफोलिओमध्ये येक नंबर (Yek Number) या सिनेमाचा समावेश करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. प्रेम आणि राजकीय नाट्य यांची सिनेमात उत्तम प्रकारे सांगड घातलीय. 'धर्मवीर 2' सिनेमानंतर आमच्या मराठी कंटेन्टमध्ये ही उत्तम कलाकृती समाविष्ट झाली आहे. यातून विविध प्रकारची कथानके सादर करण्याप्रती असलेली आमची प्रतिबद्धता दिसून येते. स्थानिक कथांमध्ये असलेल्या ताकदीवर आमचा विश्वास आहे आणि येक नंबर हा सिनेमा या व्हिजनशी पूर्णपणे सुसंगत आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवणारा आणि प्रेक्षकांना उत्तम कथानकांच्या माध्यमातून खिळवून ठेवणारा कंटेन्ट सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत."
(नक्की वाचा: भयंकर! शूटिंग दरम्यान सिहांच्या जबड्यात सापडली होती अभिनेत्री, 'या' प्रकारे वाचला जीव)
दिग्दर्शक राजेश मापुस्कर (Rajesh Mapuskar) म्हणाले, "येक नंबर (Yek Number) हा माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक प्रवास होता. या चित्रपटात प्रेम आणि राजकीय महत्त्वाकांक्षा या दोन भावना गुंफल्या आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ZEE5च्या माध्यमातून हा चित्रपट अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, याचा मला अत्यंत आनंद आहे. या प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना घरी बसून आमच्या चित्रपटाचा आनंद घेता येईल. येक नंबरच्या डिजिटल प्रदर्शनासाठी मी अत्यंत उत्सुक आहे आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या आयुष्यातील प्रेम व विचारधारा यावर अर्थपूर्ण चर्चा घडेल."
निर्मात्या तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) म्हणाल्या, "आम्हाला ही प्रभावी कथा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ZEE5 सोबत भागीदारी करताना आनंद होत आहे. 'येक नंबर'मध्ये लाखो प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्याची क्षमता आहे आणि इतके गुणवान कलाकार आणि राजेश मापुस्कर या दूरदृष्टी असलेल्या दिग्दर्शकासोबत काम करणे हा एक उत्तम अनुभव होता. या चित्रपटाचे चित्रपटगृहातील प्रदर्शन ही केवळ सुरुवात आहे. आम्ही पुढील प्रवासाबाबत आशावादी आहोत आणि ZEE5 च्या माध्यमातून ही अप्रतिम कथा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्सुक आहोत".
(नक्की वाचा: 38 वर्षांच्या अभिनेत्रीनं 49 वर्षांच्या 'बाबा' शी केलं दुसरं लग्न, Photo Viral)
सिनेमा प्रतापची व्यक्तिरेखा साकारणारे धैर्य घोलप म्हणाला की, "प्रताप ही व्यक्तिरेखा साकारण्याचा अनुभव अतुलनीय होता आणि प्रेक्षकांकडून या व्यक्तिरेखेला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाने मी अत्यंत रोमांचित झालो आहे. प्रेम आणि महत्त्वाकांक्षेने प्रेरित असलेला प्रतापचा प्रवास आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी झगडणाऱ्या अनेकांचा संघर्ष अधोरेखित करतो. चित्रपटाचे प्रभावी कथानक, आमच्या प्रतिभावान कलाकारांचा उत्तम अभिनय आणि दिग्दर्शकांचे व्हिजन यामुळे प्रेक्षकांसाठी एक आगळीवेगळी अनुभूती तयार झाली आहे. ZEE5वर चित्रपटाचा प्रीमियर होत असताना, आमच्या चाहत्यांसोबत या प्रवासात पुढे जाण्यास मी उत्सुक आहे."