जाहिरात

अदाणी ग्रीन एनर्जीचा खूप मोठा निर्णय, 'TNFD' आराखडा स्वीकारणार

अदाणी ग्रीन एनर्जीने आर्थिक वर्ष 24 मध्येच या आराखड्याच्या अनुषंगाने कामाला सुरूवात केली होती.

अदाणी ग्रीन एनर्जीचा खूप मोठा निर्णय, 'TNFD' आराखडा स्वीकारणार
मुंबई:

भारतातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी असलेल्या अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडने (AGEL) पर्यावरणाचे रक्षण आणि व्यवसाय विकास या दोन्हीसाठी मोठा संकल्प केला आहे. कंपनीने निसर्गाशी संबंधित आर्थिक प्रकटीकरणांवरील कृती दलाच्या (TNFD) महत्त्वाकांक्षी आराखड्याला आपल्या धोरणात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. अदाणी ग्रीन एनर्जीने 'ESG' (पर्यावरण, सामाजिक आणि सुशासन) अनुपालन या त्रिसूत्रीपासून आपले ध्येय आणि उद्दीष्ट्य आता निसर्गपूरक अक्षय ऊर्जा वाढीकडे नेण्याचे ठरवले आहे.  

TNFD आराखडा म्हणजे काय ?

'TNFD' हा एक संरचित, विज्ञान-आधारित दृष्टिकोन आहे. हा आराखडा संस्थांना निसर्ग आणि जैवविविधतेशी संबंधित त्यांचे अवलंबित्व, परिणाम, धोके आणि संधी ओळखण्यासाठी, त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि त्याबद्दलची माहिती सार्वजनिक करण्यासंदर्भातील मार्गदर्शन करत असतो. अदाणी ग्रीन एनर्जीने हा आराखडा स्वीकारल्यामुळे, आता स्वच्छ ऊर्जेच्या विस्तारासोबतच पर्यावरणीय कल्याणही सुकर होईल असा विश्वास आहे.  

2 कोटींहून अधिक झाडे लावण्याचे उद्दीष्ट्य

अदाणी ग्रीन एनर्जीने आर्थिक वर्ष 24 मध्येच या आराखड्याच्या अनुषंगाने कामाला सुरूवात केली होती. 'TNFD' चा अंगीकार करणाऱ्या कंपन्यांच्या समूहात औपचारिकपणे सामील होण्यापूर्वी, अदाणी ग्रीन कंपनीने मूल्यांकनाला सुरूवात केली होती.  अदाणी ग्रीन एनर्जीचे CEO आशिष खन्ना यांनी म्हटले की, "निसर्ग आमच्या विकासाच्या वाटेवरील मुख्य केंद्रबिंदू आहे. TNFD तत्त्वांना कामकाजात समाविष्ट करून, आम्ही अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधांसोबत सुयोग्य परिसंस्था तयार करण्याच्या संधी शोधत आहोत." ते पुढे म्हणाले की, अक्षय ऊर्जा विस्ताराने निसर्गाचे संरक्षण आणि त्याच्या पुनर्संचयनासाठी सक्रियपणे योगदान दिले पाहिजे. " अदाणी ग्रीन एनर्जीने 2030 पर्यंत जैवविविधतेचे नुकसान न होऊ देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्याचे वचन दिले आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रकल्पस्थळी 2 कोटींहून अधिक झाडांची लागवड करण्याचे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com