अदाणी समूहाने मंगळवारी तंत्रज्ञान क्षेत्रातील एका ऐतिहासिक गुंतवणुकीची घोषणा केली आहे. भारताला जागतिक स्तरावर 'इंटेलिजन्स रिव्होल्यूशन'मध्ये आघाडीवर नेण्यासाठी अदाणी समूह 2035 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश पुनर्वापर करता येईल अशा ऊर्जेवर (Renewable Energy) चालणारी हायपरस्केल AI डेटा सेंटर्स उभारण्याचा आहे.
नक्की वाचा: RBI Assistant Recruitment 2026: मराठी तरूणांनो चुकाल तर मुकाल; पदवीधरांना RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
पूरक उद्योगांनाही मिळणार बळ
अदाणी समूहाची ही थेट गुंतवणूक इतर पूरक उद्योगांनाही मोठी चालना देणार आहे. यामुळे 2035 पर्यंत सर्व्हर मॅन्युफॅक्चरिंग आणि क्लाउड प्लॅटफॉर्म्स यांसारख्या क्षेत्रांत अतिरिक्त 150 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे, पुढच्या दशकात भारतात एकूण 250 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीतून उत्तम प्रकारची AI इन्फ्रास्ट्रक्चर इकोसिस्टम निर्माण होईल, अशी आशा आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भात बोलताना अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी म्हणाले की, "जग एका मोठ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे. जे देश ऊर्जा आणि कॉम्प्युट (Compute) यांच्यातील ताळमेळ साधतील, तेच आगामी काळात राज्य करतील. आम्ही डेटा सेंटर्स आणि ग्रीन एनर्जीच्या बळावर भारताचे तंत्रज्ञान क्षेत्रातील सार्वभौमत्व जपण्यासाठी काम करत आहोत."
गुगल आणि मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी
अदाणी समूहाने आपल्या या उपक्रमासाठी गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. विशाखापट्टणममध्ये गुगलच्या मदतीने देशातील सर्वात मोठे AI डेटा सेंटर कॅम्पस उभारले जाणार आहे. याशिवाय नोएडा, हैदराबाद आणि पुणे येथेही नवे कॅम्पस उभारले जातील. तसेच फ्लिपकार्टसोबतची भागीदारी अधिक विस्तारून त्यांच्या डिजिटल कॉमर्ससाठी विशेष डेटा सेंटर विकसित केले जाणार आहे.
नक्की वाचा: 300 रुपयांची गुंतवणूक अन् 634 कोटींची कमाई! मलेशियन उद्योजक मालामाल, नेमकं काय घडलं?
5 GW क्षमतेचे उद्दिष्ट
अदाणी समूह आपल्या सध्याच्या 2 GW डेटा सेंटरची क्षमता 5 GW पर्यंत नेण्यासाठी काम करत आहे. यामुळे भारत जागतिक AI अर्थव्यवस्थेचे केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा एकात्मिक डेटा सेंटर प्लॅटफॉर्म ठरेल, जिथे एकाच ठिकाणी वीज निर्मितीपासून ते डेटा प्रोसेसिंगपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध असतील.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world