जाहिरात

Budget 2025 : 2025 मध्ये सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी थांबा ! बजेटपूर्वी मिळाले महत्त्वाचे संकेत

Budget 2025 : 2025 मध्ये सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी थांबा ! बजेटपूर्वी मिळाले महत्त्वाचे संकेत
मुंबई:

Gold Silver Investment: सोनं हा भारतीयांसाठी फक्त दागिना नाही तर ते एक गुंतवणुकीचं माध्यम आहे. सोनं खरेदीमध्ये भारतीय जगात नेहमीच आघाडीवर असतात. गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी बजेटनंतर सोन्याच्या किंमतीमध्ये काय बदल होऊ शकतात? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये याबबतचे स्पष्ट संकेत मिळाल आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

संसदेत शुक्रवारी (31 जानेवारी) सादर करण्यात आलेल्या आर्थिक समीक्षा अहवालानुसार 2025 मध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता असून चांदीच्या किंमतीमध्ये वाढ होऊ शकते. ऑक्टोबर 2024 मधील जागतिक बँकेच्या एका अहवालाचा दाखला यावेळी देण्यात आला आहे. त्यानुसार या किंमतीमध्ये 2025  मध्ये 5.1 तर 2026 मध्ये 1.7 टक्के घसरण होण्याचा अंदाज आहे. 

तेलांच्या किंमतीमुळे ही घसरण होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूच्या वाढत्या किंमती तसंच कृषी मालासाठीचा स्थिर दृष्टीकोन यामुळे या किंमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. आर्थिक सर्वेक्षणात सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता असून चांदीची किंमत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोहखनिज आणि जस्तच्या किंमतीमध्ये झालेली घसरण हे सोन्याची किंमत कमी होण्याचं कारण मानलं जात आहे. सर्वसाधारणपणे, भारताद्वारे आयात केलेल्या वस्तूंच्या किंमतीतील घसरणीचा कल देशांतर्गत चलनवाढीच्या दृष्टिकोनासाठी सकारात्मक आहे, असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. 

( नक्की वाचा : Economic Survey : AI मुळे देशातील नोकऱ्यांवर होणार परिणाम, आर्थिक पाहणी अहवालात गंभीर इशारा )
 

जागतिक अनिश्चिततेत वाढ झाल्याने परकीय चलनाच्या साठ्यात चढ-उतार झाले आहेत, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. 2024 मधील सोन्याचे बुलियन होल्डिंग दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वोच्च पातळीवर पोहचले असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. 

जागतिक किमतीत झालेली वाढ, सणासुदीच्या खर्चापूर्वी करण्यात आलेली खरेदी, सुरक्षित मालमत्तेची मागणी यामुळे सोन्याची आयात वाढली. वित्तीय बाजारातील अनिश्चिततेमुळे परकीय चलनाच्या साठ्याच्या रचनेत चढ-उतार होत आहेत, असं या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. डॉलरच्या वर्चस्वापासून हळूहळू दूर जाणे आणि अपारंपारिक चलनांसाठी वाढती भूमिका याकडंही या अहवालामध्ये लक्ष वेधले आहे. 

सोन्याच्या किमतीत अपेक्षित घसरण गुंतवणूकदारांच्या मनस्थितीवर परिणाम करू शकते, त्याचबरोबर चांदीच्या किमतीत अपेक्षित वाढ सराफा बाजाराला  आधार देऊ शकते, असे आर्थिक सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी आर्थिक वर्षाची तयारी करत असताना सरकारनं सराफा बाजारातील किंमतीमधील बदल, चलनवाढ, व्यापार आणि परकीय गंगाजळीवरील परिणाम याचे बारकाईने निरीक्षण करावे, अशी सूचना या अहवालात करण्यात आली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com