
PF Withdrawals : भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 7.8 कोटी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2026 पासून EPFO सदस्यांना त्यांच्या जमा झालेल्या PF कॉर्पसचा काही भाग ATM मधून काढण्याची सुविधा मिळू शकते. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कर्मचाऱ्यांसाठी निधी (Fund) तात्काळ उपलब्ध करणे अधिक सोपे होणार आहे, ज्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे
कधी होणार निर्णय?
EPFO ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) आगामी बैठकीत या ATM-विथड्रॉवल सुविधेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ही बैठक ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.
CBT च्या एका सदस्याने 'मनी कंट्रोल' ला सांगितले की, "या व्यवहारांना परवानगी देण्यासाठी EPFO ची माहिती तंत्रज्ञान (IT) पायाभूत सुविधा सज्ज आहे." मात्र, या सुविधेअंतर्गत ATM मधून पैसे काढण्याची एक मर्यादा (Withdrawal Limit) निश्चित केली जाईल, ज्यावर बैठकीत चर्चा होणार आहे.
श्रम मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "सदस्यांना त्यांच्या जमा झालेल्या रकमेचा वापर करण्यासाठी अधिक सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून देणे, हा सरकारचा उद्देश आहे आणि म्हणूनच ATM सुविधा ही काळाची गरज बनली आहे." ही सुविधा सुरू करण्यासाठी मंत्रालयाने बँका आणि RBI यांच्याशी चर्चा केली आहे.
( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेचे e-KYC करताना OTP येत नाही? ही सोपी पद्धत वापरा आणि लगेच समस्या सोडवा )
विशेष कार्ड मिळणार?
सूत्रांनुसार, EPFO आपल्या सदस्यांसाठी एक विशेष कार्ड (Special Card) जारी करण्याची शक्यता आहे, ज्याद्वारे ते ATM मधून त्यांच्या कॉर्पसचा काही भाग काढू शकतील. सध्या, पैसे काढण्यासाठी प्रक्रियेत होणारे विलंब आणि कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, ज्यामुळे तात्काळ गरजेच्या वेळी सदस्यांना अडचणी येतात. या नव्या सुविधेमुळे सदस्यांना निधीचा वापर करणे खूप सोयीचे होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
EPFO कॉर्पसमध्ये मोठी वाढ
सध्या EPFO चा एकूण कॉर्पस 28 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.
एकूण योगदान देणाऱ्या (Contributing) सदस्यांची संख्या सुमारे 7.8 कोटी आहे.
या तुलनेत, 2014 मध्ये ही आकडेवारी अनुक्रमे 7.4 लाख कोटी आणि 3.3 कोटी इतकी होती.
ऑटोमॅटिक क्लेम सेटलमेंटमध्येही सुधारणा
या वर्षाच्या सुरुवातीला, सदस्यांना निधी मिळणे अधिक सुलभ व्हावे यासाठी EPFO ने ऑटोमॅटिक क्लेम सेटलमेंटची मर्यादा 1 लाख रुपयांवरुन वाढवून 5 लाख रुपये केली होती. या प्रक्रियेत, सदस्याच्या KYC तपशिलांवर आधारित डिजिटल तपासणी आणि अल्गोरिदमचा वापर करून दाव्याची पडताळणी केली जाते, ज्यामुळे मॅन्युअल तपासणीची गरज कमी होते आणि प्रक्रिया वेगवान होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world