जाहिरात

Fact Check : RBI मार्च महिन्यापासून ATMमधून 500 रुपयांच्या देणे बंद करणार? का? नेमके काय आहे सत्य

Viral News: जेव्हापासून 2 हजार रुपयांची नोट चलनातून बंद करण्यात आलीय तेव्हापासून ATMमधून 500 रुपयांच्या नोटाच अधिक मिळतायेत. पण खरंच आता 500 रुपयांची नोटही बंद होणार आहे का?

Fact Check : RBI मार्च महिन्यापासून ATMमधून 500 रुपयांच्या देणे बंद करणार? का? नेमके काय आहे सत्य
"Viral News: 500 रुपयांची नोट रद्द होणार आहे का?"
Canva

Viral News: रोख रक्कमेची आवश्यकता निर्माण झाल्यास बँकेत जाऊन रांग लावण्याऐवजी आपण एटीएमकडे वळतो आणि डेबिट कार्डच्या मदतीने हवी तेवढी रक्कम काढतो. या सुविधेमुळे पाकिटात किंवा घरी अधिकची रोख रक्कम ठेवण्याची आता गरजच भासत नाही. जेव्हापासून 2 हजार रुपयांची नोट चलनातून बंद करण्यात आलीय तेव्हापासून ATMमधून 500 रुपयांच्या नोटाच अधिक मिळतायेत. सध्या हीच चलनातील सर्वात मोठी नोट आहे. पण अलीकडे चर्चा अशी आहे की मार्च 2026 पासून एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत, म्हणजे एटीएममधून फक्त 100 रुपयांच्या नोटाच मिळतील. सोशल मीडियावर अशा आशयाची माहिती व्हायरल होऊ लागलीय. खरंच RBIकडून 500 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्यात येणार आहे का? जाणून घेऊया व्हायरल पोस्टमागील सत्य... 

व्हायरल पोस्टमागील सत्य काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये दावा केला जातोय की, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मार्च 2026 पर्यंत एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा देणे बंद करणार आहे. पण केंद्र सरकारने शुक्रवारी (2 जानेवारी) या दावा फेटाळून लावलाय. सरकारने सोशल मीडियावर पसरत असलेल्या या खोट्या बातमीचे खंडन केले असून आरबीआय मार्च 2026 पर्यंत एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा देणे बंद करणार असल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारची फॅक्ट-चेक एजन्सी PIB Fact Check ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर पोस्ट करत म्हटलंय की, "काही सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की, भारतीय रिझर्व्ह बँक मार्च 2026 पर्यंत 500 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करणार आहे. हा दावा खोटा आहे." एजन्सीने स्पष्ट केलंय की आरबीआयने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा कोणतीही घोषणा केलेली नाही.

500 रुपयांच्या नोटा पूर्णपणे वैध

PIB फॅक्ट चेकने हेही स्पष्ट केले आहे की, 500 रुपयांच्या नोटा पूर्णपणे वैध आहेत आणि अजूनही चलनात आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी ती अधिकृत सरकारी स्रोतांकडून तपासून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आलंय.

(नक्की वाचा: SIP investment: SIPच्या मदतीनं 10 वर्षात करोडपती कसे व्हाल? किती गुंतवणूक करावी? वाचा संपूर्ण कॅलक्युलेशन )

व्हायरल पोस्टवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

वर्ष 2025मध्ये ऑगस्ट महिन्यातही अशाच प्रकारचा एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज व्हायरल झाला होता, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की आरबीआयने बँकांना 30 सप्टेंबरपर्यंत एटीएमद्वारे 500 रुपयांच्या नोटा देणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्या वेळीही सरकारने ही बातमी चुकीची असल्याचे स्पष्ट केले होते.

व्हायरल मेसेजमध्ये असेही म्हटले होते की, मार्च 2026 पर्यंत 90 टक्के आणि सप्टेंबर 2026 पर्यंत 75 टक्के एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा मिळणे बंद होईल. मात्र केंद्रीय बँकेने असे कोणतेही निर्देश जारी केलेले नाहीत, असे PIB फॅक्ट चेकने त्या वेळीही स्पष्ट केले होते. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com