Flipkart Axis Bank OTP-less Payment: ऑनलाईन शॉपिंग करताना पेमेंटच्या वेळी ओटीपीची वाट पाहणे, तो वेळेत न येणे किंवा चुकीचा ओटीपी टाकल्यामुळे व्यवहार रद्द होणे, या त्रासातून आता तुमची कायमची सुटका होणार आहे. फ्लिपकार्टने अॅक्सिस बँक आणि पेयू (PayU) यांच्या सोबतीने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता कार्ड पेमेंट करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ओटीपीची गरज भासणार नाही, तर तुमच्या फोनचा फेस आयडी किंवा फिंगरप्रिंट वापरून तुम्ही चुटकीसरशी पेमेंट करू शकणार आहात.
नेमकी काय आहे ही नवी सुविधा?
भारतातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन ही सुविधा लाँच केली आहे. या तंत्रज्ञानामुळे आता अॅक्सिस बँकेचे कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना खरेदी करताना मोबाईलवर येणाऱ्या सहा अंकी ओटीपीची वाट पाहावी लागणार नाही.
ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा फोन फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीने अनलॉक करता, अगदी त्याच पद्धतीने आता तुमचे पेमेंटही पूर्ण होईल. यामुळे पेमेंटची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोपी होणार आहे.
( नक्की वाचा : जागतिक तेल बाजारपेठेत मोठा भूकंप! 59 वर्षांनंतर UAE पडला OPEC मधून बाहेर; भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? )
ओटीपीला का नाही?
अनेकदा नेटवर्कच्या समस्येमुळे ओटीपी मिळण्यास उशीर होतो किंवा व्यवहार फेल होतात. तसेच, सध्या सिम-स्वॅप किंवा ओटीपी चोरी करून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2024 मध्ये डिजिटल फसवणुकीचा आकडा 1400 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.
ही फसवणूक रोखण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी आरबीआयनेच बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनला प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले होते. त्यालाच अनुसरून फ्लिपकार्ट आणि अॅक्सिस बँकेने ही नवी यंत्रणा राबवली आहे.
फसवणुकीला बसणार लगाम
या नवीन बायोमेट्रिक सुविधेमुळे सुरक्षा अधिक कडक होणार आहे. हा व्यवहार केवळ तुमच्याच फोनवरून आणि तुमच्याच फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीने पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे ओटीपी शेअर करण्याचा किंवा तो चोरण्याचा धोका पूर्णपणे संपणार आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोनवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना फ्लिपकार्टचे व्हाइस प्रेसिडेंट गौरव अरोरा यांनी सांगितले की, ग्राहकांचा विश्वास आणि सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. बायोमेट्रिक सुविधेमुळे ग्राहकांना सुरक्षित आणि विनाअडथळा खरेदीचा अनुभव मिळेल. तर, अॅक्सिस बँकेच्या प्रेसिडेंट अर्णिका दीक्षित यांनी स्पष्ट केले की, आजच्या ग्राहकांना डिजिटल पेमेंट केवळ सुरक्षितच नाही, तर ते सोपे आणि जलद हवे आहे, जे या सुविधेमुळे साध्य होईल.
पेमेंट क्षेत्रातील मोठी क्रांती
भारतात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जात आहे. पेयू या फिनटेक कंपनीने यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक पायाभूत सुविधा पुरवली आहे. सुरुवातीला ही सेवा अॅक्सिस बँकेच्या कार्डधारकांसाठी उपलब्ध असेल आणि भविष्यात याचा विस्तार होण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचे तर, आता तुमची खरेदी अधिक स्मार्ट आणि सुरक्षित होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world