
ICICI Bank Raises Minimum Balance For New Customers: आयसीआयसीआय बँकेने 1 ऑगस्ट 2025 पासून उघडल्या गेलेल्या बचत खात्यांसाठी आवश्यक असलेल्या मिनिमम बॅलन्समध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे. या बदलाचा परिणाम मेट्रो, शहरी, निमशहरी आणि ग्रामीण शाखांमधील ग्राहकांवर होईल.
बँकेच्या एका अधिकाऱ्यानं एनडीटीव्ही प्रॉफिटला दिलेल्या माहितीनुसार , हा निर्णय अधिक प्रीमियम ग्राहक मिळवण्याच्या धोरणाचा भाग आहे.
किती मिनिमम बॅलन्स हवे?
सुधारित नियमांनुसार, मेट्रो आणि शहरी शाखांमध्ये बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना 50,000 रुपये किमान मासिक मिनिमम बॅलन्स ठेवावे लागेल. जे पूर्वीच्या 10,000 रुपये मर्यादेपेक्षा पाचपट जास्त आहे.
निमशहरी भागांसाठी, नवीन खात्यांसाठी ही मर्यादा 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर ग्रामीण शाखांमध्ये आता 10,000 रुपये आवश्यक असतील. याउलट, विद्यमान ग्राहक त्यांच्या पूर्वीच्या मर्यादेनुसारच व्यवहार करू शकतील, ज्यात अनेक ग्रामीण आणि निमशहरी खात्यांसाठी 5,000 रुपये किमान मिनिमम बॅलन्सची आवश्यकता कायम आहे.
( नक्की वाचा : ITR Filing Deadline: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची 31 जुलैची मुदत चुकली? आता काय आहेत पर्याय? वाचा संपूर्ण माहिती )
शिल्लक कमी पडल्यास दंड
नवीन किमान मासिक सरासरी शिल्लक राखण्यात अयशस्वी ठरणाऱ्या ग्राहकांना कमी पडलेल्या रकमेच्या 6% किंवा 500 रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तो दंड भरावा लागेल.
हे नवीन नियम फक्त 1 ऑगस्ट 2025 नंतर उघडलेल्या खात्यांना लागू होतील.
इतर बँकांचे नियम काय?
आयसीआयसीआय बँकेने ही वाढ अशा वेळी केली आहे, जेव्हा अनेक बँका किमान शिल्लक न राखल्याबद्दलचा दंड कमी करत आहेत किंवा पूर्णपणे काढून टाकत आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने असे शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे.
तर, एचडीएफसी बँक मेट्रो आणि शहरी शाखांमध्ये 10,000 रुपये, निमशहरी भागात 5,000 रुपये किमान मासिक सरासरी शिल्लक ठेवते. एचडीएफसीच्या डिजीसेव्ह युथ अकाऊंटसाठी, मासिक सरासरी शिल्लक मर्यादा अनुक्रमे 5,000 रुपये आणि 2,500 रुपये आहे. बचत मॅक्स खात्यासाठी 25,000 रुपये मासिक सरासरी शिल्लक आवश्यक आहे.
पगार खातेधारकांवर काय परिणाम?
किमान शिलकीतील वाढीचा पगार खातेधारकांवर थेट परिणाम होणार नसला, तरी ही आकडेवारी उत्पन्न पातळी आणि बँकिंग गरजा यांच्यातील वाढती दरी दर्शवते. भारतातील सरासरी मासिक उत्पन्न सुमारे 33,000 रुपये आहे. याचा अर्थ मेट्रो आणि शहरी आयसीआयसीआय खात्यांसाठी 50,000 रुपये मिनिमम बॅलन्सची नवीन आवश्यकता सरासरी व्यक्तीच्या संपूर्ण मासिक कमाईपेक्षा जास्त आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world