जाहिरात

Dividend: हे तीन शेअर्स करून देतील हमखास फायदा, गुंतवणुकीसाठी आज शेवटची संधी

एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसने आर्थिक वर्ष 2025 साठी प्रति शेअर 38 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. गुंतवणूकदारांना या लाभांशाचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना आजच हे शेअर्स खरेदी करावे लागतील.

Dividend: हे तीन शेअर्स करून देतील हमखास फायदा, गुंतवणुकीसाठी आज शेवटची संधी

अनेक कंपन्यांनी लाभांश (Dividend Announcement) देण्याची घोषणा केली आहे. कंपन्या आपल्या नफ्याचा काही हिस्सा आपल्या शेअर होल्डर्सना देत असतात, ज्याला लाभांश म्हणतात. गुंतवणूकदारांना फायदा करून देणाऱ्या 3 कंपन्यांबद्दलची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या कंपन्या अशा आहेज ज्यांनी डिव्हिडंट देण्याची घोषणा केली असून या वर्षासाठीच्या डिव्हिडंटसाठी पात्र व्हायचे असेल तर तुम्हाला या कंपन्यांचे शेअर खरेदी करण्याची आजची शेवटची संधी आहे. या तीन कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2025 साठी अंतिम लाभांश जाहीर केला आहे. जर तुम्हाला या लाभांशांचा फायदा उचलायचा असेल आणि पात्र व्हायचे असेल, तर या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (L&T Technology Services)

एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसने आर्थिक वर्ष 2025 साठी प्रति शेअर 38 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. गुंतवणूकदारांना या लाभांशाचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना आजच हे शेअर्स खरेदी करावे लागतील, जेणेकरून शेअरच्या एक्स/रेकॉर्ड (X/ Record Date) तारखेपूर्वी ते लाभांशासाठी पात्र ठरू शकतील. रेकॉर्ड तारीख ही एक मर्यादा असून, डिव्हिडंडसाठीचे पात्र शेअरहोल्डर्स कोण हे ठरवण्यासाठी ही तारीख महत्त्वाची असते.  ज्या दिवशी शेअरचा व्यवहार होऊन ते शेअर तुमच्या खात्यात जमा होतो त्या तारखेला X डिव्हिडंड तारीख म्हणतात. 

(नक्की वाचा- अदाणी समूहाकडून 74,945 कोटींचा करभरणा, गेल्या वर्षीच्या तुलनेत 29% वाढ)

आपण ही बाब थोडी सोपी करून समजावून सांगूया. समजा 5 जून रोजी मी काही शेअर विकत घेतले आणि ते 5 जून रोजी माझ्या खात्यात जमा झाले तर त्या तारखेला X डिव्हिडंड तारीख म्हणतात. मी ज्या कंपनीचे शेअर खरेदी केले, त्या कंपनीने डिव्हिडंडसाठी पात्र शेअरधारकांसाठीची मर्यादा ही 6 जून ठेवली आहे तर 6 जून ही माझ्यासाठी रेकॉर्ड डेट होते. बरेचदा रेकॉर्ड डेट ही X डिव्हिडंड तारखेच्या 1-2 दिवस नंतर असते, काहीवेळा या दोन्ही तारखा एकदा दिवशी येतात.   

L&T Technology Services च्या डिव्हिडंडसाठीची रेकॉर्ड तारीख 6 जून ठेवण्यात आली आहे. T+1 सेटलमेंट सायकल लक्षात घेता, 6 जून रोजी तुम्ही या कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर तुम्ही लाभांशासाठी पात्र ठरणार नाही म्हणजेच या कंपनीचे शेअर 5 जूनला खरेदी करावे लागतील.  एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसने डिव्हिडंडच्या रुपात 402 कोटी रुपये वितरीत करण्याचे ठरवले आहे. डिव्हिडंडच्या वितरणास मंजुरी मिळाल्याच्या 30 दिवसांच्या आता डिव्हिडंडचा लाभ शेअर धारकांना मिळेल.  यापूर्वी कंपनीने 17 रुपयांच्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली होती, म्हणजेच आर्थिक वर्ष 2025 साठी कंपनी एकूण 55 रुपये लाभांश देत आहे. 14 जून 2024 रोजी कंपनीने 33 रुपयांचा अंतिम लाभांश दिला होता, तर 27 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीने 17 रुपयांचा अंतरिम लाभांश दिला होता.

(नक्की वाचा-  RBI News: 2000 रुपयांच्या किती नोटा अजूनही चलनात, आरबीआयने दिली मोठी माहिती)

टाटा स्टील (Tata Steel Ltd.)

टाटा स्टीलच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2025 साठी प्रति शेअर 3.60 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. लाभांश पेमेंट मिळवणाऱ्या शेअरहोल्डर्ससाठी पात्रतेची रिकॉर्ड तारीख 6 जून निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना लाभांशासाठी पात्र व्हायचे असेल, तर त्यांनी आजच हे शेअर्स खरेदी करणे आवश्यक आहे.  लाभांशाचे पेमेंट संचालक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर पाच दिवसांनी केले जाईल. लाभांशासाठी कंपनी एकूण 4,494 कोटी रुपये वितरीत करणार आहे, किरकोळ गुंतवणूकदारांची या कंपनीतील गुंतवणुकीचा हिस्सा 18.1% आहे, त्यांना लाभांशापोटी 813 कोटी रुपये मिळतील.

जेएसडब्ल्यू एनर्जी (JSW Energy Ltd.)

जेएसडब्ल्यू एनर्जीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2025 साठी प्रति शेअर 2 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. लाभांशासाठी पात्रतेची रिकॉर्ड तारीख 6 जून निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना लाभांशासाठी पात्र व्हायचे असेल, तर त्यांनी आजच शेअर्स खरेदी करावे लागतील. कंपनी लाभांशापोटी एकूण 349 कोटी रुपये वितरीत करणार आहे.  कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअरहोल्डर्सनी मंजुरी दिल्यानंतर 30 दिवसांच्या आत लाभांशाचे वाटप होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com