सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न आणखी कठीण बनत चाललं आहे. कारण परवडणाऱ्या घरांच्या पुरवठ्यामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. रिअल इस्टेट डेटा अॅनालिटीक कंपनी प्रॉपइक्विटीच्या (PropEquity) रिपोर्टनुसार, यावर्षी पहिल्या तिमाहीत जानेवारी ते मार्चदरम्यान 60 लाख रुपयांपर्यंतच्या परवडणाऱ्या घरांची निर्मिती 38 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. आठ शहरांमध्ये केलेल्या अभ्यासाच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. प्रॉपइक्विटीने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्चदरम्यान जवळपास 33 हजार 420 परवडणाऱ्या घरांचा पुरवठा झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बिल्डरांची अडचण काय?
प्रॉपइक्विटीचं म्हणणं आहे की, यामागील मोठं कारण म्हणजे बिल्डर आता महागडी अलिशान घरे बनवण्यावर जास्त भर देत आहेत. जमीन आणि बांधकामाचा खर्च देखील वाढला आहे. अशात परवडणारी घरे बनवणे त्यांच्यासाठी तोट्याचा व्यवहार ठरत आहे. त्यामुळे परवडणारी घरे उभारणे बिल्डर टाळत आहेत.
प्रॉपइक्विटीनुसार, दिल्ली (NCR), मुंबई (MMR), बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, पुणे, अहमदाबाद या 8 शहरांमध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान 33 हजार 420 घरांचं बांधकाम करण्यात आलं आहे. ही संख्या मागील वर्षी या काळात 53 हजार 818 होती.
(नक्की वाचा- तुमचा मुलगा 25 व्या वर्षी होईल कोट्यधीश, 'या' पद्धतीनं करा बचतीला सुरुवात)
मागील वर्षी परवडणाऱ्या घरांच्या (60 लाखांपर्यंत) पुरवठ्यात 20 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली होती. यावर्षीदेखील यामध्ये घसरण दिसत आहे. यावर्षी पहिल्या तिमाहीत देखील हा ट्रेंड कायम आहे. प्रॉपइक्विटीचे CEO & MD समीर जसूजा यांनी म्हटलं की, "देशातील टॉप 8 शहरांमधील परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. 2023 या वर्षात 60 लाख रुपयांपर्यंतच्या घरांची संख्या 1 लाख 79 हजार 103 होती. जी 2022 च्या तुलनेत 20 टक्के कमी होती. 2022 मध्ये परवडणाऱ्या घरांची संख्या 2 लाख 24 हजार 141 एवढी होती."
(नक्की वाचा- 14 जूननंतर 10 वर्ष जुने अपडेट ने केलेले आधारकार्ड बंद होणार? फुकटात असं करा अपडेट)
समीर जसूजा यांनी पुढे म्हटलं की, "हा ट्रेंड चिंता वाढवणारा आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. रिअल इस्टेटच्या वाढत्या किमती आणि बांधकामाचा वाढता खर्च यामुळे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे बिल्डर्सना कमी फायद्याचं ठरतं आहे. तर दुसरीकडे कोविड महामारीनंतर मोठ्या घरांची मागणी वाढल्याने बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचा मिड रेंज आणि लक्झरी घरांच्या निर्मितीकडे कल वाढला आहे. ज्यामध्ये बिल्डर्सना जास्त फायदा होत आहे."
शहरे | जानेवारी ते मार्च (2024) | जानेवारी ते मार्च (2023) |
मुंबई MMR | 15,202 घरे | 22,642 घरे |
पुणे | 6,836 घरे | 12,538 घरे |
अहमदाबाद | 5,504 घरे | 5,971 घरे |
हैदराबाद | 2,116 घरे | 2,319 घरे |
चेन्नई | 501 घरे | 3,862 घरे |
बंगळुरू | 657 घरे | 3,701 घरे |
कोलकाता | 2202 घरे | 2747 घरे |