सर्वसामान्य नागरीक जेव्हा भविष्याचा विचार करून आर्थिक योजना आखतो तेव्हा प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार घोळत असतो की आर्थिक उद्दीष्ट्य गाठण्यासाठी आपण पैसे जमा करू शकू का ? आपल्या मुलांचे उच्च शिक्षण असो अथवा निवृत्तीनंतर जाणवणारी आर्थिक निकड, प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या आर्थिक गरजा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी आपली गुंतवणूक किती वेगाने वाढणे गरजेचे आहे याचा अभ्यास करणे गरजेचे असते. यासाठी गुंतवणुकीचा Rule 72 आणि Rule 114 तुमची मदत करू शकतो. हे नियम वापरून तुम्ही तुमची गुंतवणूक दुप्पट, तिप्पट करण्यासाठीची आकडेमोड करणे तुम्हाला शक्य होते.
नक्की वाचा:घरबसल्या आधार कार्ड अपडेट कसं कराल? या स्टेप्स करा फॉलो!
Rule 72 काय आहे ?
नियम 72 हा एक सोपा नियम आहे. या नियमाचा वापर करून तुम्हाला हे कळू शकतं की तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी किती कालावधी लागेल. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर किती टक्के परतावा मिळतो त्या दराने 72 या संख्येला भागायचे आहे. उदाहरण म्हणून घ्यायचे झाल्यास 8 टक्के दराने तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर परतावा मिळतोय. तर तुम्हाला 72 ला 8 ने भागायचे आहे. या आकडेमोडीचं उत्तर 9 येतं. याचाच अर्थ 8 टक्के दराने परतावा मिळत असेल तर तुमची गुंतवणूक 9 वर्षांनी दुप्पट होईल. ही आकडेमोड करणे आर्थिक नियजन करण्यासाठी गरजेची असते कारण आर्थिक नियोजन करताना तुम्हाला याचा फायदा होतो. कारण यामुळे तुम्हाला मिळत असलेल्या परताव्याच्या आधारे तुम्ही तुमचे उद्दीष्ट्य किती काळात गाठू शकता याचे निश्चित उत्तर तुम्हाला मिळण्यास मदत होते.
नक्की वाचा: ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विम्याच्या हफ्त्यांवरील जीएसटीमध्ये सवलत, मंत्रिगटात निर्णय
Rule 114 काय आहे ?
रुल 72 हा गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी किती कालावधी लागेल याचे उत्तर देतो. नियम 114 हा गुंतवणूक तिप्पट होण्यासाठी किती कालावधी लागेल याचे उत्तर देतो. उदाहरण घ्यायचे झाल्यास तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर 10 टक्के व्याज मिळत असेल आणि तुमची गुंतवणूक किती काळाने तिप्पट होईल याचे उत्तर तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला 114 ला 10 ने भागावे लागेल. याचे उत्तर 11.4 असे येत. याचाच अर्थ तुमची गुंतवणूक तिप्पट होण्यासाठी 11.4 वर्षांचा कालावधी लागेल. नियम 114 हा दीर्घ काळासाठीची आर्थिक उद्दीष्ट्ये डोळ्यासमोर ठेवत उद्दीष्ट्य गाठण्यासाठी उपयोगी पडतो. तुम्हाला 10 वर्षांनतर तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठीची तरतूद करायची असेल किंवा त्यांचे लग्न करायचे असेल तर त्यासाठीची रक्कम तुम्ही किती वर्षांत गोळा करू शकता याचे उत्तर तुम्हाला मिळण्यास मदत होते.
नक्की वाचा : EPFO च्या नियमात बदल, आता 50 हजार ऐवजी 1 लाख रुपये काढता येणार
महागाई दराचा विचार आणि योग्य गुंतवणूक गरजेची
वाढती महागाई तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम करणारी ठरते. सरकारी आकड्यांनुसार महागाई दर सध्या 4 टक्के इतका असून तो येत्या काळात वाढूही शकतो. सध्याचा महागाई दर लक्षात घेून आकडेमोड केली तर आजच्या काळातले 1 लाख रुपयांची 20 वर्षांनी किंमत ही 2.5 लाखच असेल. त्यामुळे योग्य गुंतवणूक करणे हे गरजेचे असते. जेणेकरून महागाई वाढली तरी तुमच्याकडे झालेली रक्कम क्रयशक्तीच्या तोडीस तोड असेल.
6 वर्षांत पैसे दुप्पट कसे होतील ?
एक उदाहरण घेऊन आपण याचे उत्तर शोधूया. समजा तुम्ही 5 लाखांची गुंतवणूक करण्याच्या निर्णय घेतला आणि तुम्हाला 6 वर्षांनंतर 10 लाख रुपयांची गरज आहे. तर तुम्हाला अशी गुंतवणूक करावी लागेल की ज्यामध्ये तुम्हाला 12 टक्के परतावा मिळेल. तसं असेल तर Rule 72 मध्ये 6 वर्षांनी तुमचे पैसे दुप्पट होतील. मात्र सद्यस्थितीत 12 टक्क्यांचा परतावा देणारी गुंतवणूक योजना नसल्याने गुंतवणूकदारांना इक्विटी म्युच्युअल फंडाचा अथवा अन्य उच्च परतावा देणाऱ्या वैध मार्गांचा अवलंब करावा लागेल.
10 वर्षांत पैसे तिप्पट कसे करावे ?
समजा तुम्ही 5 लाख रुपये गुंतवतेल आणि 10 वर्षांनंतर तुम्हाला 15 लाख रुपयांची गरज असेल तर तुम्हाला वार्षिक 12 टक्के परतावा देणारी गुंतवणूक योजना निवडावी लागेल. तरच Rule 114 नुसार तुम्हाला 9.5 वर्षांत तिप्पट पैसे मिळतील मात्र सद्यस्थितीत 12 टक्क्यांचा परतावा देणारी गुंतवणूक योजना नसल्याने गुंतवणूकदारांना इक्विटी म्युच्युअल फंडाचा अथवा अन्य उच्च परतावा देणाऱ्या वैध मार्गांचा अवलंब करावा लागेल.