
दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचं 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झालं. व्यावसायिक मुल्यांसोबतच सामाजिक भान आणि दानशूर वृत्तीसाठी टाटा ओळखले जातं. भारतीय उद्योग विश्वाच्या इतिहासात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. टाटा यांच्या निधनाला आता सहा महिन्यांपेक्षा जास्त कालखंड उलटला आहे. त्यानंतर त्यांच्या संपत्तीमधील कोणता हिस्सा कुणाला मिळाला आहे, याची माहिती उघड झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रतन टाटा यांच्या संपत्तीची अंदाजे रक्कम 3,800 कोटी रुपये सांगितली जात आहे. त्यामध्ये टाटा सन्सचे शेअर्स तसंच अन्य गोष्टींचा समावेश आहे. टाटांनी त्यांच्या संपत्तीचा बहुतेक हिस्सा टाटा एंडोमेट फाऊंडेशन (RTEF) आणि टाटा एंडोमेंट ट्रस्ट (RTET) या स्वयंसेवी संस्थांना दिला आहे. या दोन्ही संस्था शिक्षण, आरोग्य, सामाजिक विकास या क्षेत्रांमध्ये काम करतात. टाटा आयुष्यभर ज्या मुल्यांसाठी जगले त्याला त्यांनी मृत्यूपत्रात सर्वाधिक महत्त्व दिलं आहे.
'इकोनॉमिक टाईम्स'नं याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, रतन टाटा यांनी त्यांच्या उर्वरित संपत्तीचा एक तृतीयांश हिस्सा सावत्र बहीण शिरीन जेजेभोय आणि डीना जेजोभाय यांना दिला आहे. त्यांना मिळालेल्या संपत्तीमध्ये बँकेतील ठेवी, आर्थिक साधनं, घड्याळ, पेंटिंग यांचा समावेश आहे. या संपत्तीची अंदाजे किंमत 800 कोटी इतकी आहे. टाटांनी त्यांच्या मृत्यूपत्रात एक तृतीयांश हिस्सा मोहिनी एम दत्ता यांना दिला आहे. दत्ता टाटा ग्रुपचे माजी कर्मचारी असून ते रतन टाटा यांचे निकटवर्तीय होते.
( नक्की वाचा : Ratan Tata Will : कोण आहेत मोहिनी दत्ता? ज्यांना रतन टाटांनी दिली मोठी संपत्ती )
रतन टाटा यांनी त्यांचा जुहूमधील बंगला त्यांचे सख्ये भाऊ जिमी टाटा यांना दिलाय. जिमी हे त्यांचे एकमेव जिवंत वारस आहेत. तर जवळचे मित्र मेहिल मिस्त्री यांना अलिबागची संपत्ती आणि तीन मौल्यवान बंदुका देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये .25 बोर पिस्तूलचाही समावेश आहे.
रतन टाटा यांना पाळीव प्राणी प्रिय होते. त्यांच्या लाडक्या पाळीव प्राण्यांच्या देखभालीसाठी 12 लाखांची तरतूद मृत्यूपत्रामध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक प्राण्याला दर तिमाहीमध्ये 30,000 रुपये मिळतील. टाटा यांनी त्यांचे तरुण मित्र शंतनू नायडू यांचं शैक्षणिक कर्ज माफ केलं आहे. त्याचबरोबर त्यांंचे शेजारी जॅक यांना व्याजाशिवाय शैक्षणिक कर्जाचा लाभ द्यावं असं मृत्यूपत्रात स्पष्ट करण्यात आलंय.
टाटा यांनी त्यांचे मृत्यूपत्र 23 फेब्रुवारी 2022 रोजी तयार केले होते. त्यामध्ये चारवेळा दुरुस्ती करण्यात आलीय. टाटा यांनी गुंतवणूक केलेले शेअर्स, तसेच अन्य संपत्ती ज्याचा कुठेही उल्लेख नाही ती टाटा एंडोमेट फाऊंडेशन आणि टाटा एंडोमेंट ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांना सम प्रमाणात वाटण्यात येणार आहे.
कोर्टातील कागदपत्रानुसार रतन टाटा यांच्याकडं 4 लाखांपेक्षा जास्त रक्कम, लोकल बँक अकाऊंट तसंच फिक्स डिपॉझिट 367 कोटी रुपये जमा होते. त्याचबरोबर 40 कोटी रुपयांची विदेशी संपत्ती होती. त्यामध्ये सेशेल्समध्ये जमीन, वेल्स फरगो बँक आणि मॉर्गन स्टेनलीमध्ये अकाऊंट तसंच एल्कोआ कॉर्प आणि होमेट एयरोस्पेसच्या शेअर्सचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world