RBI Plastic: फाटकी नोट नको दुसरी नोट द्या हा डायलॉग आता इतिहासजमा होणार आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा बाजारात प्लॅस्टिकच्या नोटा आणण्याच्या तयारीत आहे. कागदी नोटा लवकर खराब होत असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याचा खर्च मोठा असतो. या पार्श्वभूमीवर आरबीआयने आता प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याची तयारी सुरू केली आहे.
कागदी नोटांच्या तुलनेत प्लास्टिक नोटांचं आयुष्य खूप जास्त असतं. त्या सहजासहजी फाटत नाहीत. पाण्यातही खराब होत नाहीत. पटना आणि मुंबई येथे झालेल्या आरबीआयच्या मागील दोन बोर्ड बैठकांमध्ये या संदर्भातील प्रस्तावावर गंभीरपणे विचार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वाढती मागणी आणि कागदी नोटांचा वाढता छपाई खर्च लक्षात घेता, केंद्रीय बँक पॉलिमर नोटांसाठी एका पायलट प्रोजेक्टची (Pilot Project) आखणी करत असून, त्याची अधिकृत घोषणा नजीकच्या भविष्यात होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Japan Bans Indian Mangoes: हापूससह भारतीय आंब्यांना जपानमध्ये बंदी! तपासणीत धक्कादायक बाबी आल्या समोर)
कागदी नोटांच्या तुलनेत पॉलिमर नोटा का आहेत सरस?
'बिजनेस स्टँडर्ड'च्या रिपोर्टनुसार, रिझर्व्ह बँकेकडे पॉलिमर नोटा तयार करण्यासाठी पुरेसे तंत्रज्ञान आणि संसाधने उपलब्ध आहेत. प्लॅस्टिक किंवा पॉलिमर नोटांचे आयुष्य कागदी नोटांच्या तुलनेत खूप जास्त असते. या नोटा लवकर फाटत नाहीत, पाण्यात भिजत नाहीत आणि अधिक सुरक्षित असतात.
एटीएम मशिनसुद्धा प्लास्टिक नोटांसाठी सक्षम
सुरुवातीला या नोटांच्या निर्मितीचा खर्च जास्त वाटू शकत असला, तरी त्यांच्या दीर्घायुष्यामुळे दीर्घकाळात कागदी नोटांच्या तुलनेत यांचा छपाई खर्च अत्यंत कमी येतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, देशातील एटीएम (ATM) मशीन्स देखील पॉलिमर आधारित नोटा वितरीत करण्यासाठी सक्षम असतील, त्यामुळे बँकिंग रचनेत मोठा बदल करावा लागणार नाही.
(नक्की वाचा- VIDEO: "मी रील स्टार आहे, माझी गाडी का अडवली?", टोलमाफीसाठी क्रिएटरची चिंधीगिरी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत)
कागदी नोटा बदलण्याची मागणी का होतेय?
आरबीआयच्या आर्थिक वर्ष 2025 च्या वार्षिक अहवालातून देशातील चलनाबाबत काही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे: आर्थिक वर्ष 2024 मध्ये नोटांच्या छपाईवर 5,101.4 कोटी रुपये खर्च झाले होते, जे आर्थिक वर्ष 2025 मध्ये वाढून थेट 6,371.8 कोटी रुपयांवर पोहोचले आहेत.
आर्थिक वर्ष 2025 दरम्यान बाजारातून सुमारे 23.8 अब्ज खराब नोटा परत घ्याव्या लागल्या. हे प्रमाण आदल्या वर्षाच्या 21.24 अब्ज तुलनेत 12.3 टक्क्यांनी जास्त आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचे होते. डिजिटल व्यवहार वाढत असूनही 15 मे पर्यंत चलनात असलेल्या एकूण चलनात वार्षिक 11.5 टक्क्यांची वाढ होऊन ते 42.86 ट्रिलियन रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. तसेच आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या दीड महिन्यात चलनात आणखी 1.15 ट्रिलियन रुपयांची भर पडली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world