जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पूंछ जिल्ह्यातील मेंढर उपविभागातील बालनोई भागात भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले. या घटनेत 5 जवान शहीद झाले असून 5 जवान गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनात एकूण 10 सैनिक प्रवास करत होते.
पूंछ जिल्ह्यातील मेंढर उपविभागातील मानकोट सेक्टरमधील बालनोई भागात भारतीय लष्कराचे वाहन 300 फूट खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचे जवान एका वाहनातून त्यांच्या चौकीकडे जात असताना वाटेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बटालियन मुख्यालयातील दहा जवानांसह वाहन एलओसीच्या फॉरवर्ड पोस्टच्या दिशेने जात होते. वाहन फॉरवर्ड पोस्टजवळ येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन खोल दरीत कोसळले.
त्याचवेळी मागून येणाऱ्या लष्करी वाहनातील इतर सैनिक खाली उतरले आणि त्यांनी सर्व सैनिकांना खड्ड्यातून बाहेर काढले आणि जवळच्या लष्करी रुग्णालयात नेले. रुग्णालयात पाच जवानांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर इतर पाच जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात पूंछमध्ये पाठवण्यात आले, जिथे सर्वांवर उपचार सुरू आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world