- Six children have died of kidney failure in Madhya Pradesh's Chhindwara district in 15 days
- Investigators suspect contaminated cough syrup laced with toxic diethylene glycol as the cause of the deaths
- Most of the victims had been administered Coldrif and Nextro-DS syrups, which have now been banned
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यामध्ये एका घटनेमुळे हाहाकार उडाला आहे. गेल्या 15 दिवसांत येथे सहा चिमुकल्यांचा किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. सुरुवातीला हा संसर्गजन्य तापाचा प्रकार वाटत होता, पण आता तपासातून कफ सिरप हे या मृत्यूंचे कारण असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
मृत्यू झालेल्या सर्व मुलांचे वय पाच वर्षांपेक्षा कमी होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना प्रथम सर्दी आणि हलका ताप आला होता. स्थानिक डॉक्टरांनी नेहमीची औषधे, ज्यात कफ सिरपचा समावेश होता, दिली. ही औषधे घेतल्यानंतर मुलांना बरं वाटलं होतं. मात्र, काही दिवसांतच ही लक्षणे पुन्हा दिसू लागली. त्यानंतर मुलांना अचानक लघवी होणे थांबले. ही स्थिती किडनीच्या संसर्गात बदलली.
प्रकृती अधिक बिघडल्यामुळे मुलांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले. परंतु, त्यातील तीन बालकांचा तिथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका पालकाने सांगितले की, "आमची मुले यापूर्वी कधीच आजारी पडली नव्हती. यावेळी थोडा ताप आला, सिरप घेतल्यानंतर त्यांची लघवी थांबली आणि आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही."
(नक्की वाचा- Dombivli News: डॉक्टर म्हणाले "तब्येत ठिक आहे", मात्र काही तासातच चिमुकलीसह मावशीचाही मृत्यू)
डायएथिलीन ग्लायकोल विषबाधेचा संशय
मुलांच्या किडनी बायोप्सी अहवालात डायएथिलीन ग्लायकोल नावाचे विषारी रसायन आढळले. हे रसायन अनेकदा औषधी विषबाधेमध्ये आढळते. मृत्यू झालेल्या बहुतेक बालकांना 'कोल्ड्रिफ' (Coldrif) आणि 'नेक्स्ट्रो-डीएस' (Nextro-DS) ही दोन कफ सिरप देण्यात आली होती.
छिंदवाडाचे जिल्हाधिकारी शीलेंद्र सिंह यांनी या बायोप्सी अहवालाच्या आधारावर तातडीने जिल्ह्यात या दोन सिरपच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तसेच, त्यांनी डॉक्टर्स, फार्मसी आणि पालकांसाठी तातडीची सूचना जारी केली आहे.
(नक्की वाचा- Kalyan School: कल्याणमधील 'गांधी' शाळेत टिळा-टिकली, राखी, बांगड्यांवर बंदी; पालकांचा तीव्र संताप)
जिल्हाधिकारी सिंह यांनी म्हटलं की, "बायोप्सी रिपोर्टवरून किडनी निकामी होण्याचे कारण दूषित औषध असल्याचे स्पष्टपणे सूचित होते. बाधित गावातील पाण्याच्या नमुन्यांमध्ये कोणताही संसर्ग आढळलेला नाही. त्यामुळे ड्रग कनेक्शन दुर्लक्षित करता येणार नाही." या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, जिल्हा प्रशासनाने इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या टीमला पाचारण केले आहे. ICMR च्या टीमने रक्त आणि औषधांचे नमुने पुढील विश्लेषणासाठी पुण्यातील विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवले आहेत.