
अमजद खान, कल्याण
कल्याणमधील के. सी. गांधी (K. C. Gandhi School, Kalyan) या इंग्रजी शाळेच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. येथील के. सी. गांधी इंग्लिश स्कूलने विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेत येताना कपाळावर टिळा किंवा टिकली लावणे, तसेच विद्यार्थिनींना हातात बांगड्या आणि विद्यार्थ्यांना राखी किंवा कोणताही धागा बांधणे यावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत पालकांनी शाळेविरोधात तीव्र आंदोलन केले आहे.
पालकांनी केलेल्या दाव्यानुसार, शाळेतील प्रशासनाने केवळ बंदी घालून थांबले नाही, तर शाळेत टिळा किंवा टिकली लावून आलेल्या विद्यार्थ्यांचा जबरदस्तीने टिळा पुसण्यात आला, तर काहींना या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मारहाण देखील करण्यात आल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय, टिळा लावून आल्यास कठोर शिक्षा केली जाईल, अशी धमकीही विद्यार्थ्यांना दिली गेल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

Kalyan School
(नक्की वाचा- Dombivli News: डॉक्टर म्हणाले "तब्येत ठिक आहे", मात्र काही तासातच चिमुकलीसह मावशीचाही मृत्यू)
संतप्त पालकांनी या प्रकरणावर शाळेच्या मुख्याध्यापकांकडे धाव घेतली. त्यावेळी मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले की, "सर्व विद्यार्थ्यांना टिळा, टिकली, गंध, बांगड्या आणि राखी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे."
शिक्षण विभागाची तातडीची नोटीस
शाळेच्या या निर्णयाविरोधात आणि विद्यार्थ्यांवर होत असलेल्या कथित अत्याचाराविरोधात संतप्त पालकांनी ठाकरे गटाचे कल्याण विधानसभा संघटक रुपेश भोईर यांच्याकडे तक्रार नोंदवली. रुपेश भोईर यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे शाळेची अधिकृत तक्रार केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, कल्याण-डोंबिवली मनपा शिक्षण विभागाने तातडीने शाळेला नोटीस बजावली आहे. शाळेने घेतलेल्या या निर्णयावर आणि पालकांनी केलेल्या आरोपांवर तातडीने खुलासा सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शाळेला दिले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world