Ahmedabad Crime News: एखाद्या क्राईम वेब सीरिजलाही मागे टाकेल अशी एक खळबळजनक घटना गुजरातच्या अहमदाबाद शहरात उघडकीस आली आहे. ज्या प्रियकरासोबत नवीन संसार थाटण्याचे स्वप्न पाहून एका महिलेने स्वतःच्याच मालकाची कोट्यवधींची मालमत्ता लुटली, त्याच प्रियकराने तिला ऐन वेळी मोठा दगा दिला. तब्बल 1.66 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन हा विवाहित प्रियकर फरार झाला असून, फसवणूक झालेली प्रेयसी मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.
प्रेमात धोका अन् सर्वच उद्ध्वस्त
अहमदाबादच्या निकोल भागातील एका ज्वेलरी शोरूममध्ये हर्षिदा शेट्टी ही महिला गेल्या 11 महिन्यांपासून काम करत होती. शोरूमचे मालक दर्शन भाई यांचा तिच्यावर प्रचंड विश्वास होता. 11 मे रोजी नेहमीप्रमाणे दर्शन भाई जेवण्यासाठी घरी गेले असता, हर्षिदाने याचा फायदा घेतला. तिने हळूहळू शोरूममधील सोन्याचे दागिने आपल्या युनिफॉर्ममध्ये लपवण्यास सुरुवात केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यानंतर ती कामाचे बहाणे सांगून शोरूममधून बाहेर पडली.
(नक्की वाचा- ओबीसींसाठी मोठी बातमी! नॉन-क्रिमी लेयरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार? उपसमितीच्या बैठकीत काय घडलं?)
विवाहित प्रियकराने प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं
पोलीस तपासात समोर आले की, हर्षिदा ही घटस्फोटित असून ती गेल्या काही काळापासून प्रचंड एकटेपणाचा सामना करत होती. यादरम्यान, गेल्या 6 महिन्यांपूर्वी तिची ओळख एका विवाहित आणि मुले असलेल्या व्यक्तीशी झाली. या व्यक्तीने हर्षिदाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यासोबत नवीन आयुष्य सुरू करण्याचे खोटे स्वप्न दाखवले. पोलिसांच्या मते, याच प्रियकराने हर्षिदाला ज्वेलरी शॉपमधून चोरी करण्यासाठी प्रवृत्त केले होते.
आंघोळीला गेली अन् घात झाला!
चोरी केल्यानंतर दोघेही अहमदाबाद सोडून उत्तर भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत राहिले. ते सतत हॉटेल्स बदलत होते. मात्र, एका दिवशी हर्षिदा हॉटेलच्या बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली असता, तिच्या पाठीमागे प्रियकराने आपला खरा रंग दाखवला. ती बाहेर आली तेव्हा तिचा प्रियकर खोलीतून गायब होता आणि त्याच्यासोबत 1.66 कोटींचे बहुतांश दागिनेही गायब झाले होते. हर्षिदाच्या पर्समध्ये फक्त 18 लाख रुपयांचे दागिने शिल्लक राहिले होते. तिने प्रियकराला वारंवार फोन केला, मात्र त्याचा फोन बंद येत होता.
(नक्की वाचा- Ulhasnagar Crime: कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकायचे अन्..., विठ्ठलवाडी पोलिसांकडून दोघांना अटक)
दागिने विकताना पकडली गेली
प्रियकर सोडून गेल्यानंतर घाबरलेली हर्षिदा उर्वरित 18 लाख रुपयांचे दागिने विकण्यासाठी अहमदाबादच्या माणेकचौक परिसरात आली. मात्र, अहमदाबाद क्राईम ब्रांचला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून तिला घटनास्थळावरून ताब्यात घेतले.
क्राईम ब्रांचच्या चौकशीत तिने चोरीपासून ते प्रियकराच्या फसवणुकीपर्यंतची सर्व आपबिती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तिच्याकडील दागिने जप्त केले असून फरार प्रियकराचा शोध घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world