Viral News: गुजरातची राजधानी अहमदाबादमधील येथे एका ट्रॅफिक पोलिसाने महिलेला कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने संबंधित ट्रॅफिक हेड कॉन्स्टेबलला तात्काळ निलंबित केले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या दुचाकीवरून अंजली चौकातून जात असताना तिने ट्रॅफिक सिग्नल मोडला होता. तिथे तैनात असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी तिला थांबवले आणि ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) मागितले. यावरून महिला आणि पोलीस यांच्यात बाचाबाची सुरू झाली. वादाचे रूपांतर गंभीर स्वरूपात झाले जेव्हा महिलेने संतापून हेड कॉन्स्टेबलचे आयडी कार्ड खेचून जमिनीवर फेकले. यामुळे संतापलेल्या हेड कॉन्स्टेबलने संतापून महिलेला सर्वांसमोर कानशिलात लगावली.
डीसीपींकडून कारवाईची घोषणा
अहमदाबाद ट्रॅफिक डीसीपी भावना पटेल यांनी या प्रकरणावर म्हटलं की, "व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची चूक स्पष्टपणे दिसत आहे. कितीही वाद झाला तरी पोलीस कर्मचाऱ्याने संयम राखणे गरजेचे होते. त्यामुळे एन डिव्हिजन ट्रॅफिक पोलीसमध्ये कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबलला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे."
दोन्ही बाजूंवर कायदेशीर पेच
हेड कॉन्स्टेबलला निलंबित केले असले तरी, त्याच्या विरोधात अद्याप कोणतीही गुन्हा दाखल झालेली नाही. महिलेने दिलेल्या अर्जाच्या आधारे पालडी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली संबंधित महिलेवर एन डिव्हिजन ट्रॅफिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संबंधित महिला यापूर्वीही अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांशी अशाच प्रकारे वाद घालून हुज्जत घालताना आढळली आहे. याचाही पोलीस सखोल तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world