कुंभमेळ्यात ताटातूट झालेल्यांची लवकर भेट होत नाही, हे आपण बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये पाहिलं आहे. पण, प्रयागराजमध्ये पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या महाकुंभमध्ये तसं होणार नाही. कारण, कुंभमेळ्यात हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आता एआयची (AI) मदत घेतली जाणार आहे. महाकुंभ 2025 साठी संगणकीकृत हरवले-सापडले केंद्र सुरु केले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून भाविकांची मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर 1920 हा हेल्पलाईन नंबरही सुरु करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाकुंभ 2025 ची सुरुवात 13 जानेवारीपासून होत आहे. त्यासाठी भाविकांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभासाठी जोरदार तयारी सुरु आहे. या सर्व तयारीचा नियमित आढावा घेतला जातोय. 2025 मध्ये होणाऱ्या या महाकुंभमध्ये बदलत्या काळानुसार डिजिटलायझेनवरही भर देण्यात आला आहे. त्यानुसार महाकुंभमध्ये हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजे AI ची मदत घेतली जाणार आहे.
महाकुंभमध्ये हरवले-सापडले केंद्र बनवण्यात आले असून ते संपूर्ण संगणकीकृत आहे. त्यासाठी 1920 हा हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आलाय. या हेल्पलाईनचा वापर मुख्यत: हरवले-सापडले केंद्रासाठीच करण्यात येणार आहे.
न्यायदंडाधिकारी ज्ञानप्रकाश यांनी याबबत बोलताना सांगितलं की, 'आम्ही हरवले-सापडले केंद्र संगणकीकृत केलं आहे. या माध्यमातून लोकांचे फोटो काढणे, डेटा एकत्र करणे आणि त्याचा डेटाचा वापर करणे शक्य होईल. एआय हे नवं तंत्रज्ञान आहे. तुम्ही शब्दांच्या माध्यमातून डेटा आणि माहिती देऊ शकता. पोलीस विभागाकडून यापूर्वी स्केचिंग केले जात असते. त्याचपद्धतीनं स्केचिंगसाठी आम्ही एआयचा वापर करणार आहोत. लोकांना शोधण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
( नक्की वाचा : Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ मेळ्यात कधी होणार शाही स्नान? वाचा संपूर्ण वेळापत्रक आणि महत्त्व )
मानसोपचारतज्ज्ञही करणार मदत
यंदाच्या महाकुंभमध्ये भाविकांच्या मदतीसाठी मानसोपचार तज्ज्ञ देखीाल असतील. त्यांच्याशी सल्ला करण्यासाठी देखील केंद्र बनवण्यात आलं आहे. त्या केंद्रावर मुलं तसंच मोठ्या व्यक्तीही त्यांच्या अडचणी सांगू शकतात. त्यांना भीती वाटत असेल, अथवा काही मानसिक त्रास होत असेल तर त्यासाठी डॉक्टर्स आणि मानसोपचारतज्ज्ञ उपस्थित असतील,' असं ज्ञानप्रकाश यांनी स्पष्ट केलं.
महाकुंभमध्ये 10 संगणकीकृत हरवले-सापडले केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी एक मुख्य केंद्र असेल. तिथं सर्व केंद्रीकरण होईल. त्याचबरोबर एमआयएस सर्व्हर रुमही बनवण्यात आलंय. तिथं सर्व डेटा एकत्र केला जाईल. त्याचबरोबर हरवले-सापडलेबाबत भाविकांना काही माहिती द्यायची असेल तर 1920 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आलीय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world