
महिला आणि मुलींबाबत आक्षेपार्ह विधान करून वादात सापडलेल्या वृंदावन येथील कथावाचक अनिरुद्धाचार्य यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, जे लोक माझ्या विधानाचा विरोध करत आहेत, त्यांना विचारा की लिव-इनमध्ये राहणं योग्य आहे का? आपलं विधान योग्य असल्याचं सांगत, ते म्हणाले की, सगळेच लिव-इनमध्ये राहायला लागले, तर चारित्र्यवान मुले कशी जन्माला येतील? त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्याच्या नादात अनिरुद्धाचार्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
आज एकासोबत, तर उद्या दुसऱ्यासोबत...
एनडीटीव्हीशी बोलताना अनिरुद्धाचार्य म्हणाले की, स्त्री असो वा पुरुष, जर ते आज एकासोबत आणि उद्या दुसऱ्यासोबत राहिले, तर लग्नानंतर जन्माला येणारे मूल चारित्र्यवान कसं असेल? असं त्यांनी म्हटलं. आपण स्त्रिया आणि पुरुष दोघांवरही बोलतो, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. त्यामुळे स्त्री-पुरुष दोघांचेही चारित्र्यवान असणे महत्त्वाचे आहे, असं त्यांचं मत आहे.
नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप
'अनिरुद्धाचार्यांचा नाही, तर संतांचा विरोध'
परदेशातून परतल्यानंतर अनिरुद्धाचार्य यांनी आपल्या वादग्रस्त विधानांवर प्रश्न विचारणाऱ्यांना म्हटलं की, हा विरोध माझा नसून संतांचा आहे. वादग्रस्त विधानांवरून त्यांनी माध्यमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवाय माध्यमांवर आरोप केला की, माध्यमांनी माझे विधान अर्धवट दाखवून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम केलं आहे.
संतांना बदनाम केल्याचा आरोप
याआधी, अनिरुद्धाचार्य यांनी माध्यमांच्या एका वर्गावर त्यांना आणि संत प्रेमानंद यांना बदनाम करण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले, मी कथा सांगून कितीतरी लोकांची दारू सोडवली. प्रेमानंदजींनी सत्संगाच्या माध्यमातून लोकांना गुटखा-दारूपासून दूर ठेवलं. जेव्हा आम्ही लोकांना या वाईट सवयींपासून दूर केलं, तेव्हा काही वृत्तवाहिन्यांना ही गोष्ट खटकली. त्याचा त्यांच्या कमाईवर परिणाम होईल, असं त्यांना वाटलं, त्यामुळे त्यांनी आमच्या विरोधात मोहीम सुरू केली.
मागील काही दिवसांत कथावाचक अनिरुद्धाचार्य यांची काही विधाने चर्चेत होती. त्यांचा पहिला व्हिडिओ समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत भगवान कृष्णाचे पहिले नाव सांगण्यावरून झालेल्या वादाचा होता. त्यानंतर, अनिरुद्धाचार्य यांनी मुलींवर विधानं केली. एका विधानात त्यांनी तरुण मुलींच्या अनेक मुलांशी असलेल्या संबंधांवर तीव्र टीका केली होती. त्यानंतर त्यांनी लिव-इन रिलेशनशिपबाबत विधान केले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world