जाहिरात

Iran US War: कलाम यांनी 20 वर्षांपूर्वीच दिलेला इशारा ठरतोय खरा; आखाती युद्धाने भारताची 'ती' कमजोरी जगासमोर!

Iran US War: इराण आणि अमेरिका यांच्यात पेटलेल्या युद्धाचा भडका आता भारताच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.

Iran US War: कलाम यांनी 20 वर्षांपूर्वीच दिलेला इशारा ठरतोय खरा; आखाती युद्धाने भारताची 'ती' कमजोरी जगासमोर!
Iran US War: डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी 20 वर्षांपूर्वी दिलेल्या इशाऱ्याची आज आठवण होत आहे.
मुंबई:

Iran US War: इराण आणि अमेरिका यांच्यात पेटलेल्या युद्धाचा भडका आता भारताच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. आखाती देशांमधील हा संघर्ष केवळ दोन राष्ट्रांमधली लढाई राहिलेली नसून, त्याने भारताच्या ऊर्जा सुरक्षेची 'पोलखोल' केली आहे. भारताची हीच कमकुवत नस माजी राष्ट्रपती आणि 'मिसाइल मॅन' डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी 20 वर्षांपूर्वीच ओळखली होती, ज्याचा प्रत्यय आज देशाला येत आहे.

आखाती युद्धाचा भारतावर परिणाम

पश्चिम आशियात सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे आणि अमेरिकेने केलेल्या कारवाईमुळे कच्च्या तेलाचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. इराणने 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' या महत्त्वाच्या सागरी मार्गावर नाकेबंदी केल्याने भारताची डोकेदुखी वाढली आहे. भारताच्या स्वयंपाकघरातील बजेटपासून ते उद्योगांच्या खर्चापर्यंत सर्वच गोष्टी आता युद्धामुळे महागणार आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याची टांगती तलवार आणि महागाईचा धोका यामुळे संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे.

कलाम यांनी दिला होता इशारा

20 वर्षांपूर्वी,  तत्कालीन राष्ट्रपती डॉ. कलाम यांनी भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वतंत्र बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. ऊर्जा स्वातंत्र्य ही राष्ट्राची जीवनरेखा असते, असे सांगून त्यांनी 2020 पर्यंत ऊर्जा सुरक्षा आणि 2030 पर्यंत पूर्ण ऊर्जा स्वातंत्र्य मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. जीवाश्म इंधन म्हणजेच तेल आणि गॅसवर आपण कायमस्वरूपी अवलंबून राहू शकत नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता. आज आखाती देशांमधील परिस्थितीमुळे कलाम यांची ती दूरदृष्टी किती महत्त्वाची होती, हे सर्वांना पटत आहे.

( नक्की वाचा : Dombivli News: इराण-अमेरिका युद्धाची झळ डोंबिवलीला; MIDC मधील 70% उद्योग बंद होणार? )
 

काय होता कलाम यांचा मास्टर प्लॅन?

डॉ. कलाम यांनी केवळ एकाच स्रोतावर अवलंबून न राहता ऊर्जेच्या अनेक मार्गांचा वापर करण्याचे सुचवले होते. त्यांच्या मते, भारताने नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणजे सौर आणि पवन उर्जेचा वाटा 5 टक्क्यावरून 25 टक्क्यापर्यंत न्यायला हवा होता. त्यांनी भारताची वीज उत्पादन क्षमता 4 लाख मेगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. अणू ऊर्जेच्या माध्यमातून 50000 मेगावॅट वीज निर्मिती करणे आणि सौर ऊर्जा स्वस्त करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हा त्यांच्या प्लॅनचा मुख्य हिस्सा होता.

प्रगती झाली पण अवलंबित्व कायम

भारताने सौर ऊर्जेच्या बाबतीत मोठी मजल मारली असून सध्या देशाची सौर ऊर्जा क्षमता 143.60 गिगावॅटवर पोहोचली आहे. तसेच भारताची एकूण वीज क्षमता 520 गिगावॅट झाली आहे. नोव्हेंबर 2025 पर्यंत भारताची अपारंपारिक वीज क्षमता 262.74 गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे, जी एकूण क्षमतेच्या 51.5 टक्के आहे.

तरीही, आजही भारत आपल्या गरजेच्या 88 टक्के कच्चे तेल बाहेरून आयात करतो. ज्या मार्गावरून हे तेल येते, तो रस्ताच सध्या युद्धामुळे असुरक्षित झाला आहे. यामुळेच कलाम यांनी ज्या ऊर्जा स्वातंत्र्याचा आग्रह धरला होता, तो आजही भारतासाठी एक अपूर्ण स्वप्नच आहे.

( नक्की वाचा : Manmad: युद्धामुळे देशात गॅस टंचाई, पण मनमाडच्या गुरुद्वारामध्ये हजारोंचा स्वयंपाक होतोय बिनधास्त; वाचा कसं? )

2047 साठी मोठे पाऊल

आपण 2020 ची डेडलाईन चुकलो असलो तरी, आता भारत सरकारने शांती (SHANTI) कायदा 2025 आणून 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणू ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे. डॉ. कलाम यांचे विचार आज केवळ प्रेरणा नसून ती भारताची गरज बनली आहे. जोपर्यंत भारत ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत नाही, तोपर्यंत जगाच्या पाठीवर कुठेही झालेले युद्ध आपल्या प्रगतीचा वेग रोखत राहील, हाच धडा या खाडी युद्धाने आपल्याला दिला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com