जाहिरात
Story ProgressBack

'पेगॅसस'सारख्या तंत्राद्वारे आयफोन लक्ष्य होण्याची भीती? अ‍ॅपलने दिला इशारा

अ‍ॅपलने या स्पायवेरपासून बचावासाठी काय करावे याच्या सूचनाही दिल्या आहे ज्यामुळे लॉकडाऊन मोड सुरू करण्याच्या सल्ल्याचाही समावेश आहे.

Read Time: 2 min
'पेगॅसस'सारख्या तंत्राद्वारे आयफोन लक्ष्य होण्याची भीती? अ‍ॅपलने दिला इशारा
मुंबई:

आयफोनची (iPhone) निर्मिती करणाऱ्या अ‍ॅपल कंपनीने वापरकर्त्यांना सावध करण्यासाठी नोटिफिकेशन पाठवली आहेत. भारतासह 91 देशांमधील आयफोन वापरकर्त्यांना ही नोटिफिकेशन पाठवण्यात आली आहे. पेगॅसससारख्या घातक तंत्राद्वारे आयफोन लक्ष्य करण्यात येण्याची भीती अ‍ॅपलने वर्तवली आहे. पेगॅसस या पाळत ठेवणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील विरोधी पक्ष नेत्यांवर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीमध्ये अ‍ॅपलने जारी केलेल्या या इशाऱ्यामुळे पेगॅसस सारख्या तंत्रज्ञानाच्या आधारे पाळत ठेवण्याचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. 

अ‍ॅपल कंपनीने जारी केलेला इशारा भारतातील ग्राहकांनाही प्राप्त झाला आहे. आयफोन ग्राहकांच्या फोनमधील खासगी माहिती आणि डेटा याच्यावर पाळत ठेवली जाऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये अ‍ॅपलने अशाच स्वरुपाचा इशारा दिला होता. हा इशारा देशभरातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना प्राप्त झाला होता. ज्यामध्ये काँग्रेसचे शशी थरूर, आपचे राघव चढ्ढा, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांचा समावेश होता. सरकारच्या पाठबळावर काही जणांवर पेगॅससद्वारे पाळत ठेवण्यात येत असल्याची शक्यता असल्याचे अ‍ॅपल कंपनीने सांगितले होते. 

2021 साली सर्वोच्च न्यायालयाने एक तज्ज्ञ मंडळींची समिती स्थापन केली होती. पेगॅसस या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून पाळत ठेवता येऊ शकते का याचा शोध घेण्यासाठी या समितीची स्थापना केली होती. पेगॅसस हे इस्त्रायली कंपनी NSO ने विकसित केलेले तंत्रज्ञान आहे. ऑगस्ट 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने अहवाल दिला होता की तपासण्यात आलेल्या फोनपैकी 29 फोनमध्ये हे स्पायवेअर सापडले नव्हते, मात्र 5 मोबाईलमध्ये हे मालवेअर सापडले होते. अ‍ॅपलने म्हटले होते की काही वृत्तांनुसार काही खासगी संस्थांनी केलेल्या शोधामध्ये तंत्रज्ञान कंपन्या, पत्रकार आणि काही व्यक्तींवर सरकारी यंत्रणेच्या पाठबळाने पाळत ठेवण्यात आली होती.  अशा प्रकारे पाळत ठेवण्याचे प्रमाण कमी आहे मात्र अशा प्रकारे पत्रकार, राजकरणी आणि दूतावासातील मंडळी यांच्यावर जगभरात पाळत ठेवली जात असल्याची भीती अ‍ॅपलने  व्यक्त केली आहे. अ‍ॅपल कंपनीने वेळोवेळी याबाबतच्या सूचना जारी केल्या असून 150 देशांमधी ग्राहकांसाठी या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

पाळत ठेवण्यासाठीच्या स्पायवेअरसाठी अवाढवय खर्च येतो, हे स्पायवेअर जगभरात कुठेही वापरता येतं आणि हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर बनवण्यात आलेलं असतं. पाळत ठेवण्यासाठीचं आणि कोणालाही लक्षात येणार नाही अशा स्वरुपाचे हे डिजिटल तंत्रज्ञान आहे. पाळत ठेवण्यासाठीच्या या तंत्रज्ञानासाठी अ‍ॅपलने आतापर्यंत विशिष्ट व्यक्ती, कंपनी किंवा देशाला जबाबदार ठरवलेले नाही. अ‍ॅपलने या स्पायवेरपासून बचावासाठी काय करावे याच्या सूचनाही दिल्या आहे ज्यामुळे लॉकडाऊन मोड सुरू करण्याच्या सल्ल्याचाही समावेश आहे. अ‍ॅपलने ग्राहकांना फोन अपडेट करणे, मोबाईलवर येणाऱ्या लिंक किंवा मेसेज हाताळताना काळजी घेणे असे सल्लेही दिले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने याबातचे वृत्त दिले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination