दिल्ली मद्यविक्री घोटाळा प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या डाएटवरुन गोंधळ उडाला आहे. आज दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना डॉक्टरांशी ऑनलाइन सल्लामसलतीची मंजुरी मागण्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. यादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी तुरुंगात बटाट्याची भाजी, पुरी आणि मिठाई खाण्याच्या ईडीच्या दाव्यावर उत्तर दिलं आहे. अरविंद केजरीवाल यांचे वकील मनु सिंघवी यांनी शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयालाच्या आरोपाचं खंडन केलं आहे.
नवरात्रीचा प्रसाद म्हणून खाल्ली पुरी-भाजी
मुख्यमंत्री केजरीवाल यांचे वकील मनु सिंघवी यांनी कोर्टाला सांगितलं की, केजरीवालांनी नवरात्रीचा प्रसाद म्हणून केवळ एकदाच पुरी-भाजी खाल्ली होती आणि आपल्या चहात कृत्रिम साखरेचा वापर केला होता. ते पुढे म्हणाले, केजरीवाल जामीन मिळवण्यासाठी पक्षाघाताचा धोका पत्करणार नाहीत. त्यांनी केजरीवालांच्या वतीने कोर्टाला सांगितलं की, ते आपल्या चहात नेहमी शुगर फ्री वापरतात. ईडी किती तुच्छ आणि हास्यास्पद दावा करू शकतं? त्यांनी केलेले दावे अत्यंत चुकीचे आहेत.
हे ही वाचा-केजरीवाल तुरुंगात आंबा, मिठाईवर मारतायेत ताव? शुगर वाढल्यानंतर प्रकरण पुन्हा कोर्टात
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या राउज अव्हेन्यू न्यायालयात धाव घेऊन तिहार तुरुंग अधिकाऱ्यांना इन्सुलिन पुरवण्याबाबत सूचना मागितल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी दावा केली की, अरविंद केजरीवाल जामीनासाठी प्रयत्न करीत आहेत. सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितलं की, ईडीने दावा केला आहे की, जामीनासाठी केजरीवाल स्वत:ची साखरेची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणीही जामीनासाठी आपल्या आरोग्याशी खेळू शकेल का? असा सवाल सिंघवी यांनी उपस्थित केला आहे.