देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आजही मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील आगार तांडा येथील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या आणि शासनाच्या उदासीनतेविरोधात एक अनोखे आणि जळजळीत आंदोलन छेडले आहे.
गावात जाण्यासाठी रस्ता नाही, एसटी बस येत नाही आणि शाळा नसल्याने मुलांचे शिक्षण टांगणीला लागले आहे. या सर्व त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी हे गाव आणि गावातील सर्व सरकारी योजना विकणे आहे", असा उपरोधिक फलक लावत लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो; शिक्षण बंद
आगार तांडा येथील परिस्थिती अत्यंत बिकट असून ग्रामस्थांना रोजच्या जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. गावात जाण्यासाठी पक्का रस्ताच उपलब्ध नसल्याने नागरिकांना तब्बल 5 किलोमीटर पायी चालावे लागते. स्वातंत्र्याला 8 आठवडे/दशके उलटूनही आजपर्यंत या तांड्यावर एकही एसटी बस पोहोचलेली नाही. पावसाळ्यात चिखल आणि दळणवळणाची साधने नसल्यामुळे या तांड्याचा संपर्क इतर जगाशी पूर्णपणे तुटतो. परिणामी, लहान विद्यार्थ्यांचे वर्षभरात सुमारे 1 ते दीड महिना शिक्षणच बंद राहते.
(नक्की वाचा- Ajinkya Rahane: क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही रहाणेला BCCI कडून मिळणार दरमाह एवढी रक्कम)
"आश्वासनांचा पाऊस, पण विकासाचा थेंब नाही!"
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन केवळ निवडणुका आल्या की आश्वासनांचा पाऊस पाडतात, मात्र प्रत्यक्ष विकासाचा एक थेंबही आगार तांड्यापर्यंत पोहोचत नाही, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. "जर सरकार आम्हाला मूलभूत सुविधा देऊ शकत नसेल, तर आमचे गाव आणि सर्व सरकारी योजना विकायला काढल्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरलेला नाही," अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.
(नक्की वाचा- 'लोहगड हत्या' प्रकरणानंतर लग्न जुळवण्याची पद्धतच बदलली? नव्या ट्रेंडची धक्कादायक माहिती समोर)
अभिजित दिपके यांना आंदोलकांचे आवाहन
या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक अभिजित दिपके यांनाही विशेष आवाहन केले आहे. "दिपके यांनी केवळ पेपरफुटीच्या मुद्द्यावरच नाही, तर महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीही लढा दिला पाहिजे. अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांना मोसमी शिक्षण घ्यावे लागत आहे. गावात पहिलीची शाळा नाही आणि लहान मुलांना 3-4 किलोमीटर पायी जावे लागत आहे. त्यामुळे दिपके यांनी या खेड्यापाड्यातील गंभीर प्रश्नांकडेही तातडीने लक्ष द्यावे", असं आवाहन गाकरऱ्यांनी केलं आहे.