प्रवीण देवळेकर, प्रतिनिधी
Cat and Tomcat's Love Affair : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बायकांचा राडा सुरू आहे. त्या काय बोलतायत ते तुम्हाला कदाचित कळणार नाही. कारण ही बंगळुरूमधील घटना असल्यामुळे त्यांची भाषा आपल्याला कळत नाही. पण नेमकं भांडणाचं कारण काय आहे, ते आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. तर हा राडा आहे बंगळुरूमधील शेषाद्रीपुरम या भागातला. आणि हा राडा एका प्रेम प्रकरणातून झाला आहे. आता तुम्ही म्हणाल प्रेमप्रकरणातून राडा झाला, तर त्यात एवढं विशेष काय. पण हे प्रेमप्रकरण साधंसुदं नाही. या प्रेमकहाणीत रोमान्स आहे...फॅमिली ड्रामा आहे...आणि जबरदस्त अॅक्शन देखील आहे. कारण ही प्रेम कहाणी माणसांची नसून चक्क मांजर आणि बोक्याच्या जोडीची आहे.
त्याचं झालं असं शेषाद्रीपुरम भागात राहणाऱ्या दोन कुटुंबानी मांजर आणि बोका पाळला होता. या मांजर-बोक्याचं एकमेकांवर प्रेम जडलं. बोका आणि मांजर लपूनछपून एकमेकांना भेटू लागले. त्यांच्या या गुप्त भेटीचा सुगावा मांजरीच्या घरच्यांना लागला. त्यांनी बोका लपूनछपून छतावरून येतानाचा व्हिडीओ पुरावा म्हणून शूट करून ठेवला.
पिल्लांचा सांभाळ कोण करणार?
दोघांच्या घरच्यांनी आधी त्यांना रोखलं नाही. मग दोघांच्या प्रेमाचं रुपांतर रोमान्समध्ये झालं आणि याच रोमान्समधून दोघांनी चार पिल्लांना जन्म दिला. दोघांना वाटलं आपला सुखी संसार होईल. पण इथेच दोन कुटुंबांमधला वाद पेटला. मांजराच्या घरच्यांना ती हवी होती, पण चार पिल्लं सांभाळायची तयारी नव्हती. त्यांनी पिल्लं उचलली आणि थेट बोक्याच्या मालकाच्या घरी नेऊन सोडली. तेव्हा बोक्याच्या कुटुंबानेही पिल्लं सांभाळायला नकार दिला. बघता बघता दोन कुटुंबातला वाद राड्यापर्यंत पोहोचला.
मांजरीच्या कुटुंबाने बोक्याच्या घरातील मुलांवर अॅसिड फेकायची धमकी दिली. अॅसिड फेकायची धमकी ऐकून त्यांनी पोलिसांना बोलावलं. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हे भांडण थांबलं. पोलिसांनी दोन्ही कुटुंबाना दोन दोन पिल्लांचा सांभाळ करायला सांगितला. पण पोलिसांच्या फैसला दोन्ही कुटुंब मान्य करून मांजर आणि बोक्याला राजा-राणीचा संसार करायला देतील का ? हा प्रश्न कायम राहिलाय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world