
CJI Bhushan Gavai : भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई ( Bhushan Gavai CJI) यांनी शपथ घेतली. सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर भूषण गवई यांनी त्यांच्या आई कमलकाई गवईंना चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. त्यांच्या या एका छोट्याशा कृतीने लाखो लोकांची मने जिंकली आहे. आईचा आशीर्वाद घेताच राष्ट्रपती भवनात या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.
मात्र कमलताई गवईंची कृतीही नक्कीच दाद देण्यासारखी होती. आपल्याला वाकून नमस्कार करणारा आपला मुलगा हा आता सरन्यायाधीश झाला आहे हे त्यांना नीटपणे माहिती असल्याने त्यांनीही भूषण गवई यांना आशीर्वाद दिल्यानंतर मान झुकवत नमस्कार केला. आपला मुलगा इतक्या मोठ्या पदावर विराजमान झाल्याचा अभिमान कमलताईंच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होता.

आपला मुलगा इतका मोठा सन्मान मिळवतो तेव्हा त्याच्या आईला काय वाटते हे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. कमलताईंनी आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. मात्र यानंतर त्यांनी आपल्या मुलाचे नवे पद ध्यानात ठेवत त्याच्या पदाला साजेसे असे वर्तन केले. मुलाला आशीर्वाद दिल्यानंतर त्यांनी भारताच्या नव्या सरन्यायाधीसांना मान झुकवत नमस्कार केला. हा क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा होता.
(नक्की वाचा- Bhushan Gavai : न्यायमूर्ती भूषण गवई 52 वे सरन्यायाधीश, घेतली पदाची शपथ)

भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेण्यापूर्वी कमलताईंनी NDTV ला एक मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी सांगितले की भूषण गवई हे निर्मळ मनाचे आहेत. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ते पूर्ण करतातच. न्यायाच्या मार्गावर चालणाऱ्या भूषण गवईंना कोणीही झुकवू शकत नाही, यामुळे ते सरन्यायाधीश पदावर काम करत असताना उत्तम कामगिरी करतील असे कमलताईंनी म्हटले. भूषण गवईंना कमलताई यांनी डेअरडेव्हील म्हटले आहे. भूषण गवईंचां कोणताही निर्णय काढून बघा कायदा सर्वोपरी असे मानूनच त्यांनी निवाडा केला असल्याचे तुम्हाला दिसेल असे कमलताईंनी म्हटले.
नक्की वाचा - Justice BR Gavai : देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, भावी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आईंची मोठी मागणी
भूषण गवई यांना कोणी घरी भेटायला आले तर त्या व्यक्तीला वाटणारही नाही की ही व्यक्ती इतक्या मोठ्या पदावरील व्यक्ती आहे. ते अत्यंत शालीन आणि सुसंस्कृत असून घरात कोणी माणूस आला आणि जर ते घरी एकटे असले तर स्वत: त्याला उठून पाणी आणून देतात. मी खुर्चीमध्ये विराजमान असतो तेव्हा मी न्यायमूर्ती असतो आणि खुर्चीत विराजमान नसतो तेव्हा मी सर्वसामान्य माणूस असतो असे भूषण गवई नेहमी सांगतात असे कमलताईंनी सांगितले. भूषण गवई यांचे वडील रा.सुगवई हे नाव महाराष्ट्राला चांगलेच परिचित आहे. कमलताईंनी सांगितले की जेव्हा भूषण गवई वडिलांसोबत असायचे तेव्हा ते मुंबई मध्ये एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखेच काम करायचे. त्यावेळी जमिनीवर चादर अंथरूनही ते झोपलेले आहे, आणि याबद्दल त्यांनी कधीही तक्रार केली नाही. न्यायाच्या अपेक्षेत आलेल्या प्रत्येकाला ते न्याय देतील याची मला खात्री आहे असे कमलताईंनी म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world