पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नवीन वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण केलं. उत्तर प्रदेशाताली आग्रा ते वाराणसी दरम्यान एक वंदे भारत ट्रेन धावणार आहे. आग्रा कॅन्टपासून निघालेली वंदे भारत इटावा रेल्वे स्थानकावर थांबली. तिथे लोकांनी या नव्या ट्रेनचे स्वागत केले. या कार्यक्रमादरम्यान महिला आमदार सरिता भदौरिया देखील तेथे पोहोचल्या होत्या. प्लॅटफॉर्मवर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याच्या शर्यतीत आमदार महोदया रेल्वे स्टेशनच्या रुळावर पडल्या. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सरिता भदौरिया इटावा सदरमधून भाजपच्या आमदार आहेत. वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी त्या सोमवारी इटावा रेल्वे स्थानकावर पोहोचल्या होत्या. यावेळी प्लॅटफॉर्मवर लोकांची मोठी गर्दी होती. प्लॅटफॉर्मवरून हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आमदार सरिता भदौरिया या प्लॅटफॉर्मच्या टोकावर उभ्या होत्या. मात्र उपस्थितांचा रेटा वाढल्याने आमदार सरिता भदौरिया रेल्वे समोर ट्रॅकवर पडल्या. त्यामुळे स्टेशनवर गोंधळ उडाला.
इटावा रेल्वे स्थानकातून निघण्यासाठी वंदे भारत ट्रेनने हॉर्न देखील वाजवला होता. धक्काबुक्कीदरम्यान आमदार सरिता भदौरिया यांचा पाय घसरला आणि त्या रेल्वेसमोर रुळावर पडल्या. योगायोगाने तिथे उपस्थित लोकांनी वंदे भारतच्या इंजिनची काच हाताने फोडली आणि ट्रेनला थांबण्याचा इशारा केला.
यानंतर तेथे उपस्थित काही लोकांनी रुळावर उड्या मारून आमदार भदौरिया यांनी उचलले आणि प्लॅटफॉर्मवर चढवले. यानंतर वंदे भारत ट्रेन रवाना झाली. यावेळी कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवला, जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.