India's first hydrogen train : भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज एक सुवर्णक्षण नोंदवला गेला आहे. प्रदूषणाला पूर्णपणे ब्रेक लावत आणि डिझेल-इलेक्ट्रिक इंजिनांना मागे टाकत देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन अखेर रुळावर धावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पहिल्या हायड्रोजन पॅसेंजर ट्रेनला, म्हणजेच 'नमो ग्रीन रेल'ला (NaMo Green Rail) हिरवा झेंडा दाखवून देशाच्या नव्या आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या ट्रेनमधून धूर नाही तर फक्त पाण्याची वाफ आणि उष्णता बाहेर पडणार आहे. भारत आता जर्मनी, फ्रान्स, इटली, चीन आणि जपानसारख्या मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे, ज्यांच्याकडे हायड्रोजन रेल्वे तंत्रज्ञान आहे.
कुठे धावली देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन?
देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनचा हा ऐतिहासिक प्रवास हरियाणातील जींद ते सोनीपत या 89 किलोमीटरच्या मार्गावर सुरू झाला आहे. हा प्रवास पूर्णपणे पर्यावरणपूरक असेल. या प्रवासादरम्यान ही ट्रेन पांडू पिंडारा जंक्शन, ललित खेरा, भांभेवा आणि गोहाना या स्थानकांवर थांबणार आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क कार्बनमुक्त करण्यासाठी उचललेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल मानले जात आहे.
( नक्की वाचा : Lonavala Chikki: लोणावळ्याची चिक्की आता जगभर गाजणार; वाचा GI Tag मिळाल्यामुळे कसा होणार बंपर फायदा? )
कसे काम करते हायड्रोजन तंत्रज्ञान?
या ट्रेनमध्ये पारंपरिक डिझेल इंजिन ऐवजी हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानाचा (Hydrogen Fuel Cell Technology) वापर करण्यात आला आहे. यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रासायनिक प्रक्रियेतून वीज तयार केली जाते आणि त्या विजेवर ही ट्रेन धावते. यासाठी रेल्वे मार्गावर वरून जाणाऱ्या विजेच्या तारांची (Overhead Electrification) अजिबात गरज पडत नाही.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रक्रियेतून कोणतेही प्रदूषण होत नाही, तर उप-उत्पादन म्हणून केवळ पाण्याची वाफ आणि उष्णता बाहेर पडते.
( नक्की वाचा : Ola Uber चे भाडे आता थेट सरकार ठरवणार, राज्य सरकारचे नवे धोरण जाहीर, वाचा सविस्तर माहिती )
शंभर टक्के स्वदेशी बनावट
ही संपूर्ण ट्रेन 'मेक इन इंडिया' मोहिमेअंतर्गत भारतातच डिझाईन आणि विकसित करण्यात आली आहे. रेल्वेच्या आरडीएसओ (RDSO) संस्थेने याचे तांत्रिक निकष तयार केले असून, मेधा सर्व्हो ड्राईव्ह्सने याचे कोच इंटिग्रेशन केले आहे. तसेच आयसीएफ (ICF) चेन्नई येथे या ट्रेनची आकर्षक बाह्य रचना तयार करण्यात आली आहे.
ट्रेनची क्षमता आणि वेग काय आहे?
- एकूण 10 डबे असलेल्या या ट्रेनमध्ये 2 हायड्रोजन ड्रायव्हिंग पॉवर कार आणि 8 ट्रेलर कोच आहेत. ही ट्रेन तब्बल 3,200 हॉर्स पॉवरच्या (HP) प्रोपल्शन सिस्टमने सुसज्ज आहे.
- या ट्रेनची एकूण प्रवासी क्षमता 2,600 असून यामध्ये 682 आसन व्यवस्था उपलब्ध आहे, ज्यामुळे ही जगातील सर्वात मोठ्या हायड्रोजन पॅसेंजर ट्रेन्सपैकी एक ठरली आहे.
- या ट्रेनचा कमाल वेग ताशी 110 किलोमीटर इतका डिझाईन केला आहे, तर सध्या ती ताशी 75 किलोमीटरच्या सरासरी वेगाने धावणार आहे.
- या ट्रेनच्या इंधन भरण्यासाठी जींद येथे एक विशेष हायड्रोजन रिफ्युएलिंग स्टेशन उभारण्यात आले आहे, जिथे 350 बार दाबाने इंधन भरता येणार आहे.
सुरक्षेचे कवच आणि भविष्यातील नियोजन
हायड्रोजन गॅसच्या वापरामुळे या ट्रेनमध्ये सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये स्वयंचलित हायड्रोजन लीक डिटेक्टर्स, आग आणि धूर शोधणारे सेन्सर्स, सतत हवा खेळती ठेवणारी व्हेंटिलेशन सिस्टीम आणि गॅस गळती झाल्यास तो आपोआप बंद करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यशस्वी प्रयोगानंतर आता भारतीय रेल्वे कालका-शिमला सारख्या प्रसिद्ध आणि ऐतिहासिक हेरिटेज मार्गांवरही हायड्रोजन ट्रेन चालवण्याचे नियोजन करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world