Deaths caused by watermelon : मुंबईतील एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा रहस्यमयपणे मृत्यू झाल्यानंतर आणखी एका घटनेने देश हादरला आहे. आता मध्य प्रदेशात कलिंगड खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीचा मुलगा गंभीर असून रुग्णालयात मृत्यूची संघर्ष करीत आहे. मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात शुक्रवारी ही घटना समोर आली, ज्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे.
छातीतील जळजळ दूर करण्यासाठी कलिंगड खाल्लं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, श्योपूर शहरात रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ भाड्याच्या घरात इंद्रसिंग परमान (४३) आणि त्यांचा मुलगा विनोद (२१) राहत होते. इंद कार चालविण्याचं काम करीत होते. गुरुवारी रात्री जेवण केल्यानंतर इंद्र आणि विनोद या दोघांच्याही छातीत जळजळ होत होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत ते झोपी गेले. शुक्रवारी पुन्हा एकदा त्यांची तब्येत बिघडली. त्यांना छातीत जळजळ होत होती. त्यांना वाटलं उष्णतेमुळे त्रास होत असावा. पोट थंड व्हावं म्हणून त्यांना कलिंगड खाल्लं. मात्र कलिंगड खाल्ल्यानंतर त्यांची तब्येत अधिक बिघडली आणि अधिक त्रास जाणवू लागला. त्या दोघांना उलट्या होऊ लागल्या. चिंता व अस्वस्थता जाणवू लागली.
वडिलांचा रुग्णालयात मृत्यू, मुलगा गंभीर...
बाप-लेकाची तब्येत बिघडत असल्याचं लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवलं. येथे डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि दोघांनाही कोटा येथे पाठविण्यात आलं. यादरम्यान इंद्रसिंह यांची प्रकृती बिघडली. कुटुंबीय दोघांना कोटा येथे घेऊन जात असताना रस्त्यात इंद्रसिंह यांचा मृत्यू झाला. तर मुलगा विनोद याच्यावर कोटातील रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
डॉक्टरांनी सांगितलं कारण...
प्राथमिक तपास केल्यानंतर डॉक्टरांनी कलिंगड खाल्ल्याने त्यांची तब्येत बिघडल्याची शक्यता नाकारली आहे. मात्र फूड पॉइजनिंग किंवा अन्य संक्रमणामुळे त्यांची तब्येत बिघडल्याचा संशय आहे. इंद्रसिंह यांच्या पश्चात पत्नी संगीता, तीन मुलं असा परिवार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world