CM Vijay Poverty Controversy: तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात अत्यंत भावनिक भाषणाने केली होती, मात्र आता त्यांच्या एका जुन्या वर्गमित्राने केलेल्या दाव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आपण गरिबीत वाढलो आणि आपल्याला भुकेची जाणीव आहे, असा दावा विजय यांनी केला होता. पण हाच दावा आता खोडून काढला जात असून, विजय यांच्या बालपणाबद्दल एक वेगळीच माहिती समोर येत आहे.
विजय यांचे वर्गमित्र आणि प्रसिद्ध लेखक मनू जोसेफ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून खळबळ उडवून दिली आहे.
विजय यांचा दावा आणि वर्गमित्राचे उत्तर
तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात विजय यांनी आपल्या गरिबीचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते की, मी गरिबी पाहिली आहे आणि भूक काय असते हे मला चांगलेच ठाऊक आहे. त्यांचे हे बोलणे ऐकून अनेक चाहते भावूक झाले होते. मात्र, लेखक मनु जोसेफ यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. जोसेफ यांच्या म्हणण्यानुसार, विजय आणि ते चेन्नईच्या लॉयला स्कूलमध्ये तिसरी इयत्तेत एकत्र शिकत होते.
( नक्की वाचा : West Bengal : PM मोदींशी मैत्री, तरीही सत्तेच्या खुर्चीला लाथ; मिथुन चक्रवर्तींनी पद नाकारण्याचं कारण उघड )
गरिबीचे दावे धादांत खोटे
मनू जोसेफ यांनी आपल्या एक्स (ट्विटर) पोस्टमध्ये लिहिले की, विजय यांनी केलेले गरिबीचे दावे धादांत खोटे आहेत. विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे एक प्रसिद्ध फिल्ममेकर होते. त्यांनीच विजय यांच्यासाठी चित्रपटसृष्टीचा रस्ता सोपा करून दिला होता. जोसेफ यांनी पुढे असेही म्हंटले आहे की, चित्रपट व्यवसायात अनेकदा चढ-उतार येतात आणि कदाचित त्यांच्या वडिलांना कधी पैशांची चणचण भासली असेल, पण त्याचा अर्थ तमिळनाडूतील सर्वसामान्य गरिबी असा होत नाही. श्रीमंत घरातील मुले अनेकदा 'खिशात पैसे नसणे' आणि 'प्रत्यक्ष गरिबी' यातील फरक समजू शकत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
In his first speech as Tamil Nadu chief minister, Vijay said that he grew up in poverty, and that he even knows what hunger is. It's bullshit because he was my classmate in the third standard in Loyola School.
— Manu Joseph (@manujosephsan) May 11, 2026
His father was a filmmaker who set up his son for a career in films.…
सोशल मीडियावर संमिश्र पडसाद
मनू जोसेफ यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही युजर्सनी विजय यांच्यावर टीका करत म्हटले आहे की, आपल्या नेत्यांनी खोटे बोलणे दुर्दैवी आहे. तर काही युजर्सनी जोसेफ यांनाच प्रश्न विचारले आहेत.
एका युजरने चेन्नईत लॉयला स्कूल नावाची तिसरी इयत्तेपर्यंतची शाळाच अस्तित्वात नसल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, काही लोकांनी जोसेफ यांना त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.
विजय यांच्याकडून अद्याप मौन
या संपूर्ण वादानंतर आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री विजय यांच्याकडे लागले आहे. मनु जोसेफ यांनी केलेल्या या गंभीर आरोपांवर विजय किंवा त्यांच्या राजकीय पक्षाच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे हा गरिबीचा दावा खरा की वर्गमित्राचा आरोप, याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world