Delhi Fire : बुधवारी सकाळी राजधानी दिल्लीतील पालम परिसर गाढ झोपेत होता, तेव्हा अचानक एका इमारतीतून धुराचे लोट आणि किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. काही कळायच्या आतच एका पाच मजली इमारतीने भीषण रूप धारण केलं होतं. या आगीने केवळ एका इमारतीलाच वेढलं नव्हतं, तर एका हसत्याखेळत्या कुटुंबातील 9 जणांचा जीव घेतला. पण या मृत्यूच्या तांडवामध्ये एका बापाने आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी दिलेला लढा आता समोर आला आहे, जो ऐकून कोणाचेही डोळे ओलावतील.
लेकीला वाचवण्यासाठी बापाचा 'सुपरहीरो' अवतार
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत आगीच्या ज्वाळा पोहोचल्या होत्या आणि बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. या मजल्यावर 32 वर्षांचे अनिल आणि त्यांची दीड वर्षांची चिमुकली मुलगी अडकले होते. अग्निशमन दलाची शिडी केवळ दुसऱ्या मजल्यापर्यंतच पोहोचू शकत होती. समोर मृत्यू उभा आहे हे पाहून अनिल यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी आपल्या मुलीला छातीशी घट्ट धरलं आणि तिला खाली उतरवण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, या धावपळीत आणि धुरामुळे मुलगी त्यांच्या हातातून निसटली.
( नक्की वाचा : Acid Attack: शाळेतून निघाली अन् आयुष्याचं स्वप्न धूसर झालं! संगमनेरमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर ॲसिड हल्ला )
तिसऱ्या मजल्यावरून थेट उडी
आपल्या काळजाचा तुकडा हातातून निसटून खाली पडताना पाहून अनिल यांनी एका क्षणाचाही विचार केला नाही. त्यांनी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली उडी मारली. खाली कोणतीही सुरक्षा जाळी किंवा गादी नव्हती. मुलगी थेट जमिनीवर पडल्याने तिच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झालं, तर अनिल खाली उभ्या असलेल्या एका गाडीवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सध्या बाप आणि लेक दोघेही सफदरजंग रुग्णालयात आयुष्याची लढाई लढत आहेत.
शेजाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता फोडल्या भिंती
जेव्हा आत हे कुटुंब मृत्यूशी झुंज देत होतं, तेव्हा बाहेर शेजारी हतबल होऊन बसले नव्हते. सकाळी 6:30 च्या सुमारास आग लागल्याचे समजताच जवळच दुकान चालवणारे रघुनंदन शर्मा आणि इतर तरुण मदतीला धावले. त्यांनी हातात हातोडे घेतले आणि शेजारच्या इमारतीच्या गच्चीवरून या इमारतीची भिंत फोडण्यास सुरुवात केली.
आत अडकलेल्या लोकांच्या किंकाळ्या ऐकून ते भिंत तोडून रस्ता बनवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आतून येणारा धूर इतका विषारी आणि दाट होता की कोणालाही आत पाऊल ठेवणं शक्य झालं नाही.
( नक्की वाचा : Viral Girl मोनालिसाच्या लग्नामागे मोठं षडयंत्र? '35 तुकडे' आणि 'सीरिया'च्या दाव्याने खळबळ! )
यंत्रणेचा हलगर्जीपणा आणि एका सुखी कुटुंबाचा अंत
या घटनेत आणखी एक दुर्दैवी बाजू समोर आली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचा आरोप आहे की, अग्निशमन दलाच्या गाड्या जेव्हा पोहोचल्या, तेव्हा त्यांच्या हायड्रोलिक मशिनरी आणि प्रेशर सिस्टमने नीट काम केलं नाही. सुमारे 45 ते 50 मिनिटे लोक आपल्या माणसांना जळताना पाहत उभे होते.
या इमारतीच्या तळमजल्यावर कपड्यांचे आणि कॉस्मेटिक्सचे शोरूम असल्यामुळे आग अत्यंत वेगाने पसरली. वरच्या मजल्यावर शोरूमचे मालक राजिंदर कश्यप यांचं कुटुंब राहत होतं, ज्यातील 9 सदस्यांचा या घटनेत अंत झाला.
दिल्लीतील पालममधील या अग्नितांडवाने दिल्लीकरांच्या मनात धडकी भरवली आहे. एका बाजूला मुलीला वाचवण्यासाठी वडिलांनी दिलेलं बलिदान आणि दुसरीकडे यंत्रणेचा उशिरा झालेला प्रतिसाद, यामुळे पालममध्ये आज केवळ स्मशानशांतता पसरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world