Delhi Rain Update : नवी दिल्लीमध्ये जून महिन्याच्या सुरुवातीस इतिहासातील सर्वात भीषण उष्णतेच्या लाटांचा (Heatwave) नागरिकांना सामना करावा लागला. मुंगेशपूरमध्ये तापमानाचा पारा 52 डिग्री अंशाच्या पुढे गेला होता. आता दिल्लीकरांना मुसळधार पावसाचा (Delhi Rain) सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीमध्ये गुरुवारी (27 जून) सकाळी 8:30 ते शुक्रवारी (28 जून) सकाळी 8:30 वाजेपर्यंत या 24 तासांत 228.1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. 88 वर्षांनंतर जून महिन्यात एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस झाला आहे. यापूर्वी जून 1936मध्ये 24 तासांत 235.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उष्णतेच्या तीव्र झळांपासून ते मुसळधार पाऊस, जाणून घेऊया दिल्लीतील हवामानाची परिस्थिती...
दिल्लीतील पावसाची नोंद
दिल्लीच्या सफदरजंग वेदर स्टेशननुसार, दिल्ली विमानतळाच्या आसपासच्या भागामध्ये शुक्रवारी (28 जून) तीन तासांत 148.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर गेल्या वर्षी संपूर्ण जूनमध्ये 101.7 मिमी पाऊस झाला होता.
(नक्की वाचा: मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती)
दिल्लीत पूरसदृश्य परिस्थिती
मुसळधार पावसामुळे दिल्लीतील रस्त्यांवर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी साचल्याने गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी अनेक ठिकाणी बोटीही सोडण्यात आल्या. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना कमरेपर्यंत साचलेल्या पाण्यातून रस्ता ओलांडावा लागला. साचलेल्या पाण्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 चे पार्किंगमधील छत कोसळले. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. पावसामुळे अनेक मेट्रो स्थानकेही बंद ठेवावी लागली. एकूणच शुक्रवारी (28 जून) पावसामुळे दिल्लीत मोठा गोंधळ निर्माण झाला.
(नक्की वाचा- मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; अजित पवारांची मोठी घोषणा)
दिल्लीमध्ये एवढा पाऊस का पडला?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये मान्सून दाखल झाला आहे. शुक्रवारी सकाळी मान्सूनने उत्तराखंड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि बिहार पूर्णपणे व्यापले. हरियाणातमध्येही मान्सून दाखल झाला आहे. यानंतर मान्सून आता राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये पुढे सरकला आहे. पण राजस्थान, पंजाब आणि हरियाणातील काही भागात मान्सून अद्याप पोहोचलेला नाही.
IMDमधील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, "मान्सूनचा मार्ग आठवडाभरासाठी थांबला होता. त्यामुळे उत्तर भारतात कमी पाऊस आणि उष्ण वारे वाहत होते. मात्र गेल्या आठवड्यात अचानक आलेल्या वादळामुळे मान्सूनचा मार्गात बदल झाला. यामुळे संपूर्ण देशात मान्सून वेळेवर किंवा सामान्य वेळेच्या काही दिवस आधी पोहोचण्यास मदत होईल".
दिल्लीत इतका पाऊस पडण्यामागील कारण?
वर्ष 2022 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अमेरिकन स्पेस एजन्सी NASAच्या लेखानुसार, पृथ्वीच्या तापमानामध्ये प्रत्येकी एक अंश वाढ झाल्यास वातावरणातील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण सुमारे 7 टक्के वाढू शकते. त्यामुळे कमी कालावधीत मुसळधार पाऊस पडू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी या आठवड्यात सोशल मीडियावर केलेल्या व्हिडीओ पोस्टमध्ये म्हटलंय की, "हवामान बदलामुळे तुम्ही जास्तीत जास्त पावसाचा अनुभव घेऊ शकता. म्हणजेच कमी तासांमध्ये अधिक प्रमाणात पाऊस होईल".
सुनीता नारायण यांनी पुढे असेही म्हटले की,"तुम्ही संपूर्ण भारतातील आकडेवारी पाहिल्यास हे निदर्शनास येईल की अनेक हवामान केंद्रांनी पूर्वीच अतिवृष्टीचा इशारा दिला होता. कित्येक ठिकाणी 24 तासांत पावसाचा रेकॉर्डही मोडला आहे. तसेच संपूर्ण वर्षात अथवा संपूर्ण हंगामात जितका पाऊस पडतो तितकाच पाऊस काही दिवसांत होण्याची शक्यता आहे".
अनियमित मान्सूनचा सामना कसा करावा?
ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी या थिंक टँकचा भाग असलेले विश्वास चितळे यांनी सांगितले की, "नवी दिल्लीने गेल्या 40 वर्षांपासून अनियमित मान्सूनचा सामना केला आहे. या कालावधीत अति कमी आणि अति जास्त पावसाचा सामना करावा लागतो".
पुढे त्यांनी असेही म्हटले की, "पावसाच्या अशा विसंगत परिस्थितीचा पायाभूत सुविधा आणि नागरिकांवर परिणाम होतो. त्यामुळे हवामान बदलाची आव्हाने आपण गांभीर्याने घेतली पाहिजेत".
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, देशातील हरित पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची आवश्यकता आहे. तसेच उष्णतेचे परिणाम इत्यादी गोष्टींमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.
Delhi Heavy Rain | दिल्लीत पावसाचं तांडव, जनजीवन विस्कळीत; पाहा दिल्लीतून NDTV मराठीचा रिपोर्ट
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world