
मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. भारतातील पहिल्या मराठी विद्यापीठाची निर्मिती केली जाणार आहे. (Dr. Avinash Avalgaonkar) विशेष म्हणजे मराठी विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू पदाचा मान हा अमरावतीच्या भूमिपुत्राला मिळाला आहे. मराठी विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मूळचे अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातील काठी येथील डॉ.अविनाश आवलगावकर यांची प्रथम कुलगुरू म्हणून नियुक्ती केली आहे. देशातल्या पहिल्या मराठी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी अमरावतीच्याच मराठी भूमिपुत्राला कुलगुरू म्हणून जबाबदारी मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. तेलगू, तामिळ, हिंदी, संस्कृत, कन्नड या भाषांची विद्यापीठ सध्या भारतात अस्तित्वात आहेत. मराठीचं हे पहिलच विद्यापीठ आहे.
कोण आहेत डॉ.अविनाश आवलगावकर?
डॉ.अविनाश आवलगावकर हे मूळचे अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातील राजुराबाजार पासून दोन किलोमीटरवर असलेल्या काठी या छोट्याशा गावचे. आवलगावकर यांचे वडील हे अमरावती जिल्ह्यातच शिक्षक म्हणून कार्यरत होते. अविनाश आवलगावकर 1995 पासून पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते अहमदनगरच्या एका महाविद्यालयात देखील कार्यरत होते.
'संशोधन महर्षी' उपाधीने सन्मानित
महानुभाव साहित्यावर डॉ.अविनाश आवलगावकर यांचा विशेष अभ्यास आहे, गेल्या वर्षी त्यांना नागपूरच्या विदर्भ संशोधन मंडळाने 'संशोधन महर्षी' या उपाधीने सन्मानित करण्यात आल होतं. महानुभाव साहित्य, संत साहित्य आणि आधुनिक साहित्यात त्यांचे विशेष योगदान आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीला चालना देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी NDTV मराठीशी बोलताना दिली. भाषा हे केवळ संपर्क साधन नसून तिला एक सांस्कृतिक मूल्य आहे. ते मूल्य समाजामध्ये रुजवण्यासाठी या विद्यापीठाच्या माध्यमातून खूप काही प्रयत्न करता येतील, असेही डॉ. आवलगावकर यांनी अधोरेखित केले.
नक्की वाचा - लाडक्या बहिणींसाठी Good News, मुदतवाढ अन् 4500 रुपये थेट खात्यात; शासनाचा मोठा निर्णय
डॉ. अविनाश वामन आवलगावकर
जन्म - 1 जुलै 1958
प्रकाशित पुस्तके -
किलबिल (काव्यसंग्रह), 1984-85 सालचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
सांजबावरी (काव्यसंग्रह)
श्रीगोविंदप्रभुविषयक साहित्य - शोघ आणि समीक्षा
वि.स. खांडेकरांची कविता
वि.स.खांडेकरांचे साहित्य - एक आकलन (संपादन)
मराठीचे भवितव्य (संपादन)
मराठी साहित्य - संशोधनाच्या नव्या दिशा
महानुभाव साहित्य - शोधसंचार
संशोधनाचे विषय... (काम सुरू)
श्रीगोविंदप्रभुचरित्र 450 लीळांचे संशोधन आणि संपादन
केसरी उद् बोधविरचित सिद्धांसार
महानुभाव कवी आणि त्यांची साहित्यविषयक भूमिका
महानुभावांचे ओवी वाड्मय
ज्ञानदेवांचे शुकाष्टक - दोन हस्तलिखिते
ज्ञानदेवांचे स्वात्मानुभूतीपर अभंग
कवी यंकु आणि त्याची अभंगरचना
शेख महंमदकृत साठीसंवत्सर
महानुभावांची साठीसंवत्सरे
संशोधन -
श्रीगोविंदप्रभुचरित्र - संशोधन आणि संपादन या शोधप्रकल्पासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाची संशोधनवृत्ती
महानुभावांचे स्फुट साहित्य - संशोधन आणि संपादन या शोधप्रकल्पासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाकडून रिसर्च करिअर अॅवॉर्ड प्राप्त.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world