
भारतातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदाणी यांनी SMISS-AP च्या 5 व्या वार्षिक संमेलनामध्ये बोलताना डॉक्टरांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला सलाम केला. मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट हा आपला अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी एक असल्याचे सांगत त्यांनी ताठ कणा नागरिकांसाठी आणि देशासाठी का महत्त्वाचा आहे हे सांगितले.
मानवता आणि वैद्यकीय क्षेत्राची महती
अदाणी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याला आदराने सलाम करत केली. ते म्हणाले, "देशातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोत्तम व्यक्तींसमोर उभे राहून बोलण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. तुमच्या कामाबद्दल तुम्हाला सॅल्युट आहे. तुम्ही मंडळी करत असलेल्या उत्तम कामामुळे रुग्ण पुन्हा एकदा ताठपणे उभे राहू शकतात. जगासाठी तुम्ही मणक्याची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर असाल, मात्र तुमच्या रुग्णांसाठी तुम्ही फार मोठे आहात. तुम्ही 'आशेचे' प्रतिबिंब आहात." मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटाचा संदर्भ देत अदाणी म्हणाले, "मुन्नाभाई हा लोकांना नुसतं बरं करत नसतो, तर तो लोकांना ममत्वाने बरे करण्याचा प्रयत्न करत असतो. यातून एक गोष्ट कळते ती म्हणजे शस्त्रक्रिया नाही तर बरे होण्याची प्रक्रिया ही त्यापलिकडची आहे. बरे होणे ही एक आशा जागृत करणारी गोष्ट आहे, बरे होणे ही मानवतेचे प्रतीक आहे." त्यांनी मुन्नाभाईचे प्रसिद्ध वाक्य उद्धृत केले, "जादू की झप्पी हो या सर्जरी का स्कालपेल दोन्हीत एक गोष्ट सामायिक असते ती म्हणजे करुणा भाव."
ताठ कण्याचे महत्त्व
आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील अनुभवांबद्दल बोलताना अदाणी यांनी 16 व्या वर्षी घेतलेल्या एका धाडसी निर्णयाची आठवण करून दिली. ते म्हणाले, "मानवी शरीरामध्ये कण्याचे फार महत्त्व असते. तो जिद्दीपणाचे प्रतीकही असतो. मानवी शरीरामध्ये ज्याप्रकारे ही जिद्द पुन्हा जागवली जाते, तशाच पद्धतीने एक नेतृत्व संस्थेमध्येही जिद्द जागृत करत असतं."
"आत्मविश्वासाच्या कण्याच्या जोरावर मी एक मोठा निर्णय वयाच्या 16 व्या वर्षी घेतला होता. मी सेकंड क्लासचे तिकीट काढून मुंबई गाठली. डिग्री नाही, नोकरी नाही, बॅकअप नाही असे असतानाही काहीतरी करून दाखवण्याच्या पोटातील आगीमुळे मी माझा मार्ग निर्माण करण्याचा निश्चय केला होता." अदाणी यांनी भारताच्या आर्थिक उदारीकरणाच्या बदलांबद्दलही भाष्य केले. "मुन्नाभाईमध्ये बापूंनी सांगितले होते की, 'बदलाव लाना है तो सोच बदलनी होगी.' 1985 मध्ये राजीव गांधी यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचे दरवाजे उघडले. यामुळे एक मोठा बदल झाला. त्यानंतर अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांसाठी व्यापक निर्णय घेतले." डिव्हॅल्युएशन, डिरेग्युलेशन आणि ग्लोबलायझेशनमुळे अनेक बडे कॉर्पोरेट धराशायी झाले. मात्र जिद्दी आणि ताठ कण्याच्या लोकांसाठी ही एक मोठी संधी होती असे अदाणी यांनी म्हटले.
अदाणींनी मणक्याच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या भारतीयांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली. "भारत हा मणक्याच्या त्रासामुळे होणारी महामारी अनुभवतोय. दोनपैकी एका भारतीयाला कंबरदुखीचा त्रास असतो. यामुळे उत्पादकता कमी होतेय, आरोग्यावरील खर्च वाढतोय आणि अनेक स्वप्न भंगतायत."
या समस्येवर उपाययोजना सुचवताना त्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांना आवाहन केले. त्यांनी म्हटले की, 'एआय आधारित निदान सुविधा: कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मणक्याच्या त्रासाचे निदान करणारी सुविधा निर्माण केल्यास अपंगत्व येण्यापासून अनेकांना रोखता येईल. ग्रामीण भागात कमी खर्चात आणि उत्तम दर्जाची मणक्यावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी मोबाइल ऑपरेटिंग युनिट सुरू झाल्यास मोठा बदल होऊ शकेल.' मणक्याच्या त्रासावर इलाज करणारी विशेष रुग्णालये उभारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
या बदलांसाठी अदाणी समूह खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. 3 वर्षांपूर्वी त्यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त 60,000 कोटी रुपयांचा निधी आरोग्यसेवा आणि कौशल्यविकासासाठी उभारण्याचा त्यांच्या घरच्यांनी निश्चय केला होता. 1,000 खाटांची क्षमता असलेले 'अदाणी हेल्थकेअर टेंपल' मुंबई आणि अहमदाबाद येथे 'मेयो हॉस्पिटलच्या' सहकार्याने सुरू केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world