Girl Apologizes To PM Modi: दिल्लीतील सीजेपी (CJP) आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपशब्द वापरणाऱ्या मुलीने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे माफी मागितली आहे. व्हिडीओमध्ये ती मुलगी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागताना दिसत आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. मुलीच्या माफीनाम्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
'...मला माफ करा'
व्हिडीओमध्ये ती मुलगी म्हणत आहे, "आंदोलनादरम्यान मी काही लोकांच्या अपप्रचाराला बळी पडले आणि मी पंतप्रधानांविरोधात अनेक वाईट गोष्टी बोलले." पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर (FIR) मध्ये तिचे वय 25 वर्षे असल्याचे नमूद केले होते. पण आपल्या माफीनाम्याच्या व्हिडीओमध्ये तिने आपले वय अवघे 15 वर्षे असल्याचा दावा केला आहे.
'मी फक्त 15 वर्षांची आहे, मला खूप लाज वाटतेय'
माफी मागताना या मुलीने म्हटलंय की, "मी फक्त 15 वर्षांची आहे, मी जे काही केले ते माफीयोग्य नाही. मी खूप वाईट गोष्टी बोलले आहे." आपली ही पहिली आणि शेवटची चूक असल्याचे सांगत तिने या अपशब्दांबाबत संपूर्ण देशाची माफी मागितली आहे. "मला खूप लाज वाटत आहे, मी स्वतःलाही पाहू शकत नाहीय. कृपया मला माफ करा." दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओच्या सत्यतेची एनडीटीव्ही (NDTV) पुष्टी करत नाही. हा केवळ एक व्हायरल व्हिडीओ आहे, ज्याबद्दल आम्ही केवळ माहिती देत आहोत.
पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी बुधवारी नोएडामधील पोलीस ठाण्यात या मुलीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. नोएडा पोलिसांनी 'झीरो एफआयआर' (Zero FIR) नोंदवून हे प्रकरण नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याकडे वर्ग केले. तक्रारदाराने म्हटले होते की, मुलीच्या अपशब्दांमुळे पीएम कार्यालयाचा अपमान झाला आहे, यामुळे अशांतता पसरू शकते आणि सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते.
मुलीचा हा व्हिडीओ पंतप्रधान मोदींच्या त्या इन्स्टाग्राम व्हिडीओच्या अवघ्या काही तासांनंतर समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान स्वतःविरुद्ध अपशब्द वापरल्यांना माफ केल्याचे म्हटलंय. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (31 जुलै) रात्री पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, शिवीगाळ केल्याने कोणत्याही समस्येवर तोडगा निघत नाही. त्यांनी समाजाला आवाहन केले की, जे लोक भरकटले आहेत त्यांना शिक्षा देण्याऐवजी योग्य मार्ग दाखवला पाहिजे. पंतप्रधान मोदी म्हणाले होते, "जंतर-मंतरवर जे काही घडले, ते देश आणि जगाने पाहिले. काही भरकटलेल्या तरुणांनी अशा भाषेचा वापर केला, ज्याला कोणत्याही सुसंस्कृत समाजात स्थान नाही. मला शिव्या देण्यात आल्या आणि माझ्या स्वर्गीय आईलाही अपशब्द बोलले गेले."
राग किंवा बदला घेण्याच्या भावनेने समस्येचे निवारण होणार नाही
पंतप्रधान मोदींनी आपल्याविरोधात अपशब्द वापरणाऱ्यांना "भरकटलेले" म्हटले आणि सांगितले की, याचे निवारण राग किंवा बदला घेण्याच्या भावनेने होईल असे त्यांना वाटत नाही. पंतप्रधान म्हणाले, "लहान वयात चुका होतात आणि हेच वय त्या चुका सुधारण्याची संधीही देते, तरुण असण्याचा अर्थ हाच आहे. "पंतप्रधानांनी सांगितले की समाजात संताप आहे आणि ते तो समजतात. पण आता वेळ आली आहे की या मुलांना जवळ करावे आणि त्यांना योग्य मार्ग दाखवावा. ही मुले भरकटली आहेत. त्यांना योग्य मार्ग दाखवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना शिक्षा देणे, कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावणे आणि त्रास देणे याने परिस्थिती बदलणार नाही".
Abuses never solve anything.
— Narendra Modi (@narendramodi) July 31, 2026
Let's guide the misguided.
Let's work together.
Let's work for Bharat. pic.twitter.com/yAePG60KYL
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अपशब्द वापरणाऱ्या लोकांना ते माफ करू इच्छितात आणि त्यांनी समाजालाही असेच करण्याचे आवाहन केले. त्यांनी समाजाला सांगितले की, शिवीगाळ केल्याने कोणत्याही समस्येचे निवारण होत नाही. चला, जे लोक भरकटले आहेत त्यांना योग्य मार्ग दाखवूया आणि देशासाठी एकत्र मिळून काम करूया.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world