पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात 'सेवा संकल्प अभियान' राबवले जात आहे. या अभियानांतर्गत पंतप्रधान मोदींचा सेवाभाव, समर्पण, राष्ट्रभक्ती आणि सुशासनाचा प्रवास जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'नमो सेवा – अनसुनी कहानियाँ' (नमो सेवा गाथा) या विशेष पथनाट्य उपक्रमाचा महाराष्ट्रात भव्य शुभारंभ करण्यात आला.
मुंबईतील केसी महाविद्यालयात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पथनाट्य सादर करणाऱ्या कलाकारांचा आणि संयोजकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
15 ऑक्टोबर 2026 पर्यंत राज्यभरात प्रयोग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील संघर्ष, राष्ट्रनिष्ठा आणि जनसेवेचे प्रेरणादायी प्रसंग पिंपरी-चिंचवडमधील नवोदित कलाकार पथनाट्याच्या माध्यमातून राज्यभरात मांडणार आहेत. 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात एक मोठा प्रयोग आयोजित केला जाईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किमान 10 पथनाट्य प्रयोग पार पडतील.
या मोठ्या व्याप्तीमुळे राज्यभरातील हजारो नागरिकांपर्यंत हा सामाजिक आणि प्रेरणादायी संदेश पोहोचणार असून नवोदित कलाकारांनाही मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
'हनुमान अंश'प्रमाणेच इतिहास घडवणार!
कार्यक्रमप्रसंगी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरित्रातून आपल्याला सेवाभाव, सुशासन, समर्पण आणि राष्ट्रभक्तीची शिकवण मिळते. त्यांच्या जीवनातील असे प्रेरणादायी क्षण पथनाट्याच्या माध्यमातून जनमानसात रुजवण्यासाठी ‘नमो सेवा गाथा' हा स्तुत्य उपक्रम आहे. ‘हनुमान अंश' या नवोदित कलाकारांच्या चित्रपटाने ज्याप्रमाणे रेकॉर्ड निर्माण केले, त्याचप्रमाणे ‘नमो सेवा गाथा' हे पथनाट्य देखील रेकॉर्ड करेल" असा विश्वास यावेळी रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजप प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे आणि अमित गोरखे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world