"मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते", प्रख्यात कवी सुरेश भटांनी लिहिलेल्या कवितेतील ओळी अनेक घटनांमध्ये चपखलपणे लागू होतात. गुजरातमधील हवालदार बाबूभाई प्रजापती यांना जवळपास 30 वर्षांनी न्याय मिळाला. कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. त्यांच्यावर 20 रुपये लाच घेतल्याचा आरोप होता. या प्रकरणी त्यांना स्थानिक न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती, ज्याला प्रजापती यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. प्रजापती यांना त्यांच्या बाजूने निकाल मिळाला खरा मात्र दुसऱ्या दिवशी त्यांच्यासोबत अघटित घडले.
नक्की वाचा: बहीण दुबईत, भाऊ अमेरिकेत, मुलं सीए-इंजिनिअर, तरीही अट्टल चोर; एका गोष्टीमुळे अडकला
सत्र न्यायालयाने सुनावली 4 वर्षांची शिक्षा, उच्च न्यायालयाने ठरवले निर्दोष
हे प्रकरण 1996 सालचे आहे. अहमदाबादमधील वेजलपुर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार बाबूभाई प्रजापति यांच्यावर 20 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. 1997 मध्ये त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झाले. 2004 मध्ये सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून 4 वर्षांची सक्त मजुरी आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला बाबूभाईंनी गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले. ही याचिका तब्बल 22 वर्षे प्रलंबित होती. अखेर 4 फेब्रुवारी 2026 रोजी उच्च न्यायालयाने निकाल दिला. साक्षीदारांच्या जबाबातील तफावत आणि पुराव्यांचा अभाव लक्षात घेता, न्यायालयाने बाबूभाईंची निर्दोष मुक्तता केली.
नक्की वाचा: शिमल्याला फिरायला जाणं जीवावर बेतू शकतं! मुंबईतील महिलेसोबत काय घडलं?
निर्दोष मुक्त झाले आणि दुसऱ्या दिवशी घेतला अखेरचा श्वास
निकाल लागल्यानंतर बाबूभाई अत्यंत भावूक झाले होते. निर्दोष मुक्त झाल्यानंतर त्यांनी वकिलांच्या कार्यालयात आपल्या भावनांना वाट करून दिली होती. ही घटना तेथील CCTV कॅमेऱ्यातही कैद झाली होती. "आता माझ्या नावावरचा कलंक पुसला गेला आहे, आता मरण आले तरी चालेल." हे त्यांचे निर्दोष मुक्त झाल्यानंतरचे शब्द होते. त्यांनी उच्चारलेले हे शब्द दुर्दैवाने अखेरचे आणि खरे ठरले. निर्दोष मुक्त झाल्याने आनंदी मनाना घरी परतलेल्या बाबूभाई यांचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला.