नवरा-बायकोंमधील नातं हे जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक असतं. पण, हे नातं जेव्हा ओझं बनतं त्यावेळी आयुष्यात पुढं वाटचाल करणं अवघड होतं. त्यामुळे अनेकदा हे नातं तोडण्याचा निर्णय पती-पत्नी घेतात. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारी असते. एका वृद्ध शेतकऱ्यावरही ही वेळ आली. त्यांना घटस्फोटानंतर पत्नीला 3 कोटी निर्वाह भत्ता देण्यासाठी स्वत:ची जमीन विकावी लागली. लग्नानंतर तब्बल 44 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
हरयाणामधील करनालमधील हे प्रकरण आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्याचं लग्न 1980 साली झालं होतं. त्यांचा तब्बल 44 वर्षांनी घटस्फोट झाला आहे. या दोघांमधील पतीचं वय पुढील महिन्यात 70 होईल. तर पत्नीचं वय 73 आहे. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. हे दोघं 8 मे 2006 पासून वेगळे राहत होते. तब्बल 18 वर्षांच्या मोठ्या कायदेशीर लढाईनंतर या दोघांचा घटस्फोट झाला.
2013 मध्ये फेटाळला होता अर्ज
पतीने घटस्फोटासाठी सर्वात प्रथम करनालच्या फॅमिली कोर्टात अर्ज केला होता. पण, 2013 साली कोर्टानं त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर पतीने या प्रकरणात हायकोर्टात अर्ज दाखल केला. हायकोर्टात हे प्रकरण 11 वर्ष प्रलंबित होतं. त्यानंतर हायकोर्टानं हे प्रकरण मध्यस्थ केंद्राकडं पाठवलं. त्यानंतर पती आणि पत्नीमध्ये मध्यस्थी झाली.
( नक्की वाचा : Atul Subhash : 'बाळा, हे पाकीट 2038 मध्ये उघड', बंगळुरुच्या इंजिनिअरनं मृत्यूपूर्वी मुलाला दिलं गिफ्ट )
जमीन विकून दिले पैसे
या प्रकरणात पत्नी, मुलं आणि पती यांनी 3.07 कोटी रुपये निर्वाह भत्ता देण्यास सहमती दर्शवली. हे प्रकरण संपवण्यासाठी पतीनं स्वत:ची जमीन विकून 2 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट दिला. त्यानंतर 50 लाख रुपये रोख रक्कम दिली. पतीनं ही रक्कम पिकं विकून जमा केली. त्याचबरोबर 40 लाख रुपयांचे दागिनेही पत्नीला निर्वाह भत्ता म्हणून दिले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world