- भारतीय हवामान विभागाने 2026 साली देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे
- यंदा मान्सूनमध्ये एल निनोच्या सक्रियतेमुळे पावसाचा प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे
- जूनमध्ये पावसाची सुरुवात चांगली राहील, मात्र जुलै ते सप्टेंबर दरम्यान पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे
रामराजे शिंदे
भारतीय हवामान विभागाने (IMD) 2026 सालासाठी नैऋत्य मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवला आहे. यंदा देशात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यावर्षी देशात सरासरीच्या सुमारे 92% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा आकडा सामान्य मान्सूनच्या तुलनेत कमी असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज भारतीय हवामान विभागाने पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस रडवणार अशी शक्यता आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार आहे. त्यामुळे पाऊस शेती, मार्केटवर पाणी पाडणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी मॉन्सूनला एवढी घाई झाली होती की वेळेआधीच चक्क मे महिन्यातच मान्सूनची गाडी भारतात दाखल झाली होती. यंदा मात्र पावसानं रडवण्याची तयारी केली आहे. पाऊस कसा राहील, याबद्दलचा अतिशय महत्त्वाचा अंदाज आयएमडी म्हणजेच भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदा पाऊस सरासरी पेक्षा कमी पडणार आहे. यंदा सरासरीच्या 92 टक्के एवढाच पाऊस होईल. सामान्यपेक्षा यंदा पाऊस कमकुवत असू शकेल. मात्र काही भागांमध्ये सामान्य किंवा त्याहून चांगला पाऊस पडू शकतो असं आयएमडीने सांगितलं आहे. यामुळे कृषी, तलावांची पातळी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.
भारतीय हवामान विभागाबरोबरच स्कायमेटनंही काही दिवसांपूर्वी पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. स्कायमेटच्या अंदाजामध्ये यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. स्कायमेटने यंदा 40% कमी पाऊस आणि 30% दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये सरासरीच्या फक्त ९४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा 'एल निनो'सक्रिय असल्यानं त्याचा मान्सूनवर परिणाम होईल. त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होईल. जूनमध्ये पावसाची सुरुवात चांगली राहील. त्यावेळी सामान्य पाऊस असेल. जुलै ते सप्टेंबर या पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात पावसाची तीव्रता कमी होईल आणि पाऊस अनिश्चित राहील. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कमी पावसाचा अंदाज आहे.
यंदा अल निनोची परिस्थिती असल्यानं पावसाचं चक्र बिघडणार आहे. अल निनो म्हणजे पॅसिफिक महासागरातल्या अल निनो प्रवाहाची स्थिती. पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचं तापमान वाढतं. ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकतं तेव्हा त्याला 'अल निनो' म्हटलं जातं. त्याच्या विरोधातल्या परिस्थितीला 'ला निना' असे म्हणतात.'अल निनो' आणि 'ला निना' प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर, मान्सूनवर परिणाम होतो. 'अल निनो'च्या काळात कमी पाऊस पडतो, दुष्काळ पडतो. तर 'ला निना'च्या काळात जास्त पाऊस पडतो.
भारताचं मान्सूनशी काय नातं आहे, भारतात दरवर्षी पाऊस कसा असतो, तेही समजून घेऊया. भारत तीन बाजूनं समुद्रानं वेढलेला आहे. भारताच्या ईशान्येपासून उत्तरेपर्यंत हिमालयाच्या रांगा आहेत. भारतात चार महिने पाऊस पडतो. 1 जूनच्या सुमाराला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत मान्सून माघारी फिरतो. भारतात दरवर्षी साधारणपणे सरासरी 87 सेंटीमीटर पाऊस पडतो. त्यापैकी 70 % पाऊस जून ते सप्टेंबर काळातच होतो. पाऊस कमी झाला की त्याचा शेतीवर परिणाम होतो. अन्नधान्याचं उत्पादन कमी होतं आणि महागाई वाढते. महागाई वाढली की मार्केटवर परिणाम होऊन सगळं अर्थचक्रच बिघडतं. हवामान विभागाचा हा पहिला अंदाज आहे तर दुसरा अंदाज मे महिन्यात जाहीर केला जाईल. त्यावेळी मान्सूनची दिशा, वेळ आणि महाराष्ट्रात नेमका किती पाऊस पडेल, हे आणखी स्पष्ट होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world