Maharashtra Monsoon Rain: जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्राला झोडपल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजा चिंतेत आहे. पेरण्या, शेतीची कामे खोळंबल्याने शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. मात्र हा आठवडाही पाऊस कोसळणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे अपुरा पाऊस आणि जलसाठे आटल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
कधी परतणार पाऊस?
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून गायब झालेला मान्सून कधी कमबॅक करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र दडी मारलेला मान्सून या आठवड्यातही कोसळणार नसल्याची चिन्ह आहेत. मान्सूनच्या कमबॅकबाबत मोठी अपडेट समोर आली असून 20 जुलैनंतर तो सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा आठवडासुद्धा कोरडाच जाणार आहे.
आजपासून पुढचा रविवार आणि सोमवारपर्यंत राज्यात कुठेही पावसाची शक्यता नसल्याची माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली आहे. मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस सक्रिय नसेल. प्रशांत महासागरात निर्माण झालेला अन निनो आणखी प्रभावशाली होतोय. त्याच्याच जोडीला अफगाणिस्तानमधून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहत आहेत. या दोन्ही घटकांमुळे मान्सून निष्क्रिय झाला आहे. आता 20 जुलैनंतर बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रावर मान्सूनची भिस्त आहे.
दरम्यान, पावसाने दडी मारल्याने विदर्भात मोठा फटका बसला आहे. विदर्भात पावसाची तूट 27 टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे जलसाठेही आटले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विदर्भात सात टक्के कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. दरवर्षी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यामध्येच बहुतेक जलसाठे अर्धेअधिक भरलेले असतात. यावर्षी मात्र दडी मारलेल्या पावसाने तोंडचं पाणी पळवले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world